झोपडीधारकांना न्याय मिळवून देणार

विरोधी पक्ष नेते अरविंद म्हात्रे यांचे आश्वासन

| पनवेल | प्रतिनिधी |

पनवेल रेल्वे स्टेशन परिसरात असलेल्या नवनाथ नगर झोपडपट्टीतील काही झोपडीधारकांना त्यांच्या झोपड्यांसाठी नगरपरिषद असतानाच्या कालखंडामध्ये कर पावती दिली जात होती. मात्र महापालिका अस्तित्वात आल्यानंतर त्या झोपडीधारकांना अवैध ठरवून त्यांची कर पावती रद्द करण्यात आली. वास्तविक गेले अनेक वर्षे तिथे राहत असलेल्या या झोपडीधारकांना अवैध ठरवल्यामुळे पालिकेकडून त्यांच्या डोक्यावर कारवाईची टांगती तलवार ठेवण्यात आली आहे. अशा परिस्थितीमध्ये आपण उघड्यावर येऊ ही भीती या नागरिकांना सतावत आहे. त्यामुळे पनवेल महापालिकेतर्फे त्यांच्या झोपड्यांना पुन्हा एकदा कर पावती सुरू करण्यात यावी, या मागणीसाठी नवनाथ नगर झोपडीधारकांनी पनवेल महानगरपालिकेच्या प्रांगणात उपोषणाला बसले आहेत.
बुधवारी (दि.15) पनवेल महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते अरविंद म्हात्रे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन, त्यांचा प्रश्न व त्यांच्या मागण्या जाणून घेतल्या. यावेळी अरविंद म्हात्रे यांनी सदर झोपडीधारकांना लवकरात लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यावेळी नगरसेवक हरेश केणी, गटनेते केतन म्हात्रे, नगरसेवकप्रकाश म्हात्रे, नगरसेवक राम पाटील, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

Exit mobile version