। अलिबाग । प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेतील कोट्यवधी रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणात धक्कादायक वळण आले असून, या प्रकरणातील एक आरोपीत कर्मचाऱ्याने विषारी द्रव्य सेवन करून आत्महत्या केली आहे. ज्योतिराम पांडुरंग वरुडे (48), रा. तळाशेत, इंदापूर, ता. माणगाव यांनी अलिबाग जवळील विद्यानगर येथे मेव्हण्याच्या घरी हे टोकाचे पाऊल उचलले. फेब्रुवारी 2025 मध्ये जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागात कोट्यवधी रुपयांचा आर्थिक अपहार झाल्याची तक्रार उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात नोंदवली होती. या प्रकरणी ज्योतिराम वरुडे, नाना कोरडे आणि महेश मांडवकर या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या चौकशी प्रकरणात वरुडे यांच्यावर मानसिक तणाव वाढत चालल्याची देखील चर्चा सुरू होती. 20 ऑक्टोबर रोजी, त्यांनी विद्यानगर येथे आपल्या मेव्हण्याच्या घरी असताना विषारी कीटकनाशक प्राशन केले. त्यामुळे त्यांना उलटी होऊ लागली व नातेवाईकांनी तातडीने अलिबाग जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचार सुरू असतानाच दीपावलीच्या दिवशी सोमवारी (दि. 20) सकाळी 6:30 वाजता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. या घटनेबाबत त्यांची पत्नी अश्विनी वरुडे (47) यांनी अलिबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली असून, पोलीस तपास सुरू आहे. दरम्यान, या घटनेनंतर जिल्हा परिषदेमध्ये खळबळ उडाली आहे. कर्मचारी वर्गात भीतीचे वातावरण पसरले असून, वरिष्ठ अधिकाऱ्यापर्यंत संशयाची सुई पुन्हा एकदा फिरू लागली असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या आत्महत्येमुळे अपहार प्रकरणाची पारदर्शक चौकशी करण्याची मागणी राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून जोर धरू लागली आहे.
या घटनेमुळे जिल्हा परिषद प्रशासनातील आर्थिक व्यवस्थापन आणि जबाबदारीच्या प्रश्नांवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. आता या प्रकरणाचा तपास कोणत्या दिशेने जातो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. संपूर्ण रायगडचे लक्ष या प्रकरणाकडे लागले आहे. दिवाळीच्या सणात घडलेल्या या दुर्दैवी घटनेने संपूर्ण रायगड जिल्ह्यात चर्चेचे आणि संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्योतिराम वरुडे यांच्या मृत्यूमुळे कोट्यवधींच्या अपहारप्रकरणाला नवे वळण मिळाले असून, ही आत्महत्या की दबावाची परिणती? या प्रश्नाचे उत्तर पुढील तपासात स्पष्ट होईल.
ज्योतिराम वरुडेची आत्महत्या; जिल्हा परिषद अपहार प्रकरणाला नवे वळण?
