आरोपींचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळले
| अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
रायगड जिल्हा परिषदेच्या वेतन फरकाच्या कोट्यवधींच्या घोटाळ्यातील आरोपी जोतीराम पांडुरंग वरुडे आणि महेश गोपीनाथ मांडवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज अतिरिक्त सत्र न्यायाधीश, रायगड-अलिबाग एस.डी. भगत यांनी फेटाळून लावला आहे. अर्ज फेटाळताना न्यायालयाने या प्रकरणात इतर अधिकार्यांचा सहभाग नाकारता येत नाही, असे महत्त्वपूर्ण निरीक्षण नोंदविले आहे. तर, न्यायालयाने या घोटाळ्यातील प्रमुख आरोपी नाना कोरडे यांच्या पत्नी सोनाली नाना कोरडे यांचा अटकपूर्व जामीन मात्र मंजूर केला आहे. सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी याबाबत पाठपुरावा केला.
न्यायालयाने अटकपूर्व जामीन फेटाळताना पुढीलप्रमाणे निरीक्षणे नोंदविलेली आहेत. अर्जदारांवरील आरोप गंभीर आहेत, ज्यात खोटेपणा, आर्थिक फसवणूक आणि सार्वजनिक विश्वासाचा भंग यांचा समावेश आहे. गुन्ह्याचे स्वरूप सार्वजनिक निधीचा सुनियोजित गैरवापर सूचित करते, ज्याची सखोल चौकशी आवश्यक आहे. इतर अधिकार्यांचा सहभाग नाकारता येत नाही, आणि केवळ कोठडीत चौकशीतच मोठ्या कटाचा उलगडा होण्यास मदत करू शकते. अर्जदाराची लोकसेवक म्हणून स्थिती पाहता, अटकपूर्व जामीन मिळाल्यास ते महत्त्वपूर्ण नोंदींमध्ये छेडछाड करू शकतात किंवा संभाव्य साक्षीदारांवर प्रभाव टाकू शकतात, अशी वाजवी भीती आहे. वरील निष्कर्ष लक्षात घेता, या न्यायालयाचे असे मत आहे की, प्रकरणाच्या निष्पक्ष आणि प्रभावी तपासासाठी अर्जदारांची कोठडीत चौकशी करणे आवश्यक आहे. त्यामुळे अर्जदार जोतीराम वरुडे आणि महेश मांडवकर यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात येत आहे. सरकारतर्फे जिल्हा सरकारी वकील अॅड. संतोष पवार यांनी जोरदार युक्तीवाद करून सरकारची बाजू यावेळी मांडली.
प्रकरण काय?
रायगड जिल्हा परिषदेतील पाणी पुरवठा विभागातील कर्मचार्याने एक कोटी तेवीस लाख रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचे तसेच रायगड एकात्मिक बाल विकास विभागातही नाना कोरडे, ज्योतिराम वरुडे व महेश मांडवकर या वेतन देयक तयार करणार्या कर्मचार्यांनी 4 कोटी 12 लाख 34 हजार 771 रुपयांचा अशा प्रकारे एकूण 5 कोटी 35 लाख 34 हजार 771 रूपयांचा अपहार उघडकीस आला होता. भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम 482 अन्वये अटकपूर्व जामीन (अगोदर जामीन) मिळण्यासाठी पगार बिले तयार करण्याची जबाबदारी सोपवलेले लोकसेवक जोतीराम वरुडे आणि महेश मांडवकर या अर्जदारांनी अर्ज दाखल केला होता. अलिबाग पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा नोंदविण्यात आला होता.