वाळवटी गावातील नागरिकांसाठी नवीन विद्युत रोहित्र
| मुरुड | प्रतिनिधी |
कमी दाबाच्या वीजपुरवठ्यामुळे मुरुड तालुक्यातील वाळवटी येथील नागरिक त्रस्त झाले होते. शेकाप प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या प्रयत्नाने ही समस्या तातडीने सोडविण्यात आली. चित्रलेखा पाटील यांनी महावितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा करून वाळवटी गावांतील नागरिकांसाठी नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले. चित्रलेखा पाटील यांच्या पाठपुराव्यामुळे कमी दाबाच्या वीज समस्येचा कायम स्वरुपी निपटारा झाला असून, गावांतील नागरिकांसह महिला वर्गाकडून आभार व्यक्त करण्यात आले.
मुरुड तालुक्यातील वाळवटी गावामध्ये गेल्या अनेक वर्षांपासून कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची गंभीर समस्या निर्माण झाली होती. अपुऱ्या विद्युत दाबामुळे ग्रामस्थांना प्रचंड त्रास सहन करावा लागत होता. घरगुती वापरातील विद्युत उपकरणे वारंवार बंद पडत होती. त्याचा आर्थिक फटका नागरिकांना बसत होता. विशेषतः उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये या समस्येची तीव्रता अधिक जाणवत होती. ग्रामस्थांनी ही समस्या शेतकरी कामगार पक्षाच्या प्रवक्त्या चित्रलेखा पाटील यांच्या निदर्शनास आणून दिली. जनतेच्या प्रश्नांबाबत सदैव संवेदनशील असलेल्या चित्रलेखा पाटील यांनी या प्रश्नाची तात्काळ दखल घेत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे पाठपुरावा केला. महावितरण अधिकाऱ्यांकडे वाळवटी येथील नागरिकांच्या व्यथा प्रभावीपणे मांडल्या. या समस्येवर त्वरित आणि कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी केली. त्यांच्या अथक प्रयत्नांना अखेर यश मिळाले. मूरूड तालुक्यातील मोहल्ला येथे नवीन विद्युत रोहित्र बसविण्यात आले. परिणामी गावातील कमी दाबाच्या वीजपुरवठ्याची समस्या मोठ्या प्रमाणात दूर झाली असून, नागरिकांना आता सुरळीत वीजपुरवठा मिळू लागला आहे. या कामामुळे वाळवटी गावात समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामस्थांनी चित्रलेखा पाटील यांचे आभार व्यक्त केले आहेत. चित्रलेखा पाटील यांनी आमची समस्या स्वतःची समजून शासन व प्रशासन दरबारी प्रभावी पाठपुरावा केला. त्यामुळे आज आमच्या गावाला दिलासा मिळाला आहे, अशा भावना ग्रामस्थांनी व्यक्त केल्या आहेत.






