हजारो एकर वन जमिनीचा वापर; प्रस्तावित प्रकल्प पर्यावरणाच्या मुळावर
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत तालुक्यात हजारो एकर वन जमिनीचा वापर करून टोरंट कंपनी जलविद्युत प्रकल्प साकारत आहे. या प्रकल्पाच्या कामासाठी वन जमिनीवर बुलडोझर फिरवला जाणार असून, कर्जत तालुक्यात पर्यावरणाचा ऱ्हास करण्यास कारणीभूत ठरणार आहे. दरम्यान कर्जत तालुक्यात पाच धरणे बांधली जात असून, कर्जत तालुका भविष्यात भूकंप प्रवण तालुका बनणार असल्याचे बोलले जात आहे.
कर्जत तालुक्याच्या दक्षिण दिशेला उल्हास नदीवर सिडको कडून कोंढाणे धरण बांधले जात आहे. तर, पूर्व भागात पोटल पाली आणि कोतवाल खलाटी भागात टोरंट प्रकल्प, भिवपुरी भागात पेज नदीवर टाटा प्रकल्प, बोरगाव येथील पोश्री नदीवर पोशीर धरण आणि चिल्हार नदीवर शिलार येथे शिलार धरण होणार आहे. हि पाचही धरणे तालुक्याच्या दोन दिशेला बांधली जाणार आहेत. या पाचही धरणामुळे कर्जत तालुक्यातील नद्या पावसाळ्यात देखील कोरड्या राहण्याची शक्यता आहे. कदाचित त्यापेक्षाही भयावह स्थिती कर्जत तालुक्यात दररोज अनुभवास मिळणार आहे. ही धरणे बांधली जात असताना अब्जवधी लिटर पाण्याचा साठा होणार आहे. त्या पाण्याच्या साठ्यामुळे कर्जत तालुक्याला दररोज भूकंपाचे हादरे बसण्यास सुरुवात होणार आहे. हे हादरे पर्यावरणाचा समतोल ढासळण्यास कारणीभूत ठरणार आहेत. त्यामुळे कर्जत तालुक्यात गरज नसतानाही पाच धरणे बांधली जाणार असल्याने कर्जतकर भुकंपाच्या छायेखाली येणार आहेत.
तसेच, ही धरणे बांधली जात असताना त्याचा तेथील जमिनीवर परिणाम होणार आहे. प्रकल्पासाठी शेत जमीन घेतली जाईल. त्यामुळे शेती क्षेत्र कमी होणार आहे. त्यामुळे आपोआप पिकांची उत्पादकता कमी होईल आणि स्थानिक अन्ननिर्मितीवर परिणाम होईल. त्याचबरोबर प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणावर झाडे तोडली जातील. झाडतोडीमुळे जंगलातील प्राणी, पक्षी व कीटकांचे अधिवास नष्ट होतील. जैवविविधता कमी होईल; काही प्रजातींचे लुप्त होण्याचा धोका आहे. मोठ्या प्रमाणात फॉरेस्टची जमिन देखील संपादन होणार आहे. दरम्यान, प्रकल्पासाठी मोठ्या प्रमाणात पाणी लागेल, त्यामुळे शेतकऱ्यांना पाण्यासाठी संघर्ष करावा लागू शकतो. तसेच, प्रकल्पातील मशीन व वाहतूकामुळे धूळ, कार्बन डायऑक्साईड व इतर प्रदूषक वायू हवेत मिसळतील. त्यामुळे स्थानिक लोकांमध्ये श्वसनाचे आजार, दम आणि त्वचेचे आजार वाढू शकतात. प्रदूषित हवा झाडे व पिकांवरही परिणाम करेल. हवामान व नैसर्गिक पर्यावरण तसेच प्रकल्पामुळे स्थानिक तापमान वाढू शकते आणि पावसाचे पॅटर्न बदलू शकतात; काही काळ कोरडेपणा किंवा पूर येण्याची शक्यता आणि नैसर्गिक वातावरणाचे संतुलन बिघडेल.
प्रकल्पाविरोधात आंदोलनाची शक्यता
प्रकल्पासाठी झाडे तोडली जाणार आहेत. या झाडतोडीमुळे अप्रत्यक्ष परिणाम दिसून येणार आहेत. येथील झाडे तोडल्यामुळे हवामान उष्ण होणे. परिसरात उष्णता वाढेल. मातीची ओलसरता कमी होईल व पावसाळ्यात भूस्खलन व मातीची धूप होईल. पक्षी व कीटक कमी होऊन परागीकरण आणि फळ उत्पादनावर परिणाम होईल. मानवी आरोग्यावर परिणाम तसेच हवा व पाणी प्रदूषणामुळे श्वसन, हृदय, त्वचा व पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे कर्जत तालुक्याचा ऱ्हास करणारी प्रकल्प सरकारने रद्द करावेत. यासाठी मोठे आंदोलन कर्जत तालुक्यात उभे राहण्याची शक्यता निर्मण झाली आहे.






