लाखो रुपयांचा दंड वसूल
| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर पोलीस आणि वाहतूक पोलिसांनी विना हेल्मेट दुचाकी स्वार यांच्यावर दंडात्मक कारवाई करून दंड वसूल केल्याने दुचाकीस्वार यांना घाम फुटला आहे. दरम्यान, चार दिवसांत तीन दुचाकीस्वार हे हेल्मेट न घातल्याने जीवाला मुकले आहेत. त्यामुळे रायगड जिल्हा पोलीस अधिक्षक आंचल दलाल यांनी रस्ता सुरक्षा आणि अपघातांचे प्रमाण कमी करण्यासाठी रायगड जिल्हा पोलीस प्रशासन व वाहतूक पोलीस यांना विना हेल्मेट वाहन चालवणाऱ्यांवर कडक दंडात्मक आणि कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या धडक कारवाईत 103 दुचाकीस्वारांवर गुन्हा दाखल करून 1 लाख 3 हजार रुपयांचा दंड वसूल केला आहे. या कारवाईचे कौतुक आणि समाधान व्यक्त होत आहे. हेल्मेट न वापरल्याने दुचाकी अपघातात डोक्याला गंभीर दुखापत होण्याचा धोका 74 टक्केपर्यंत वाढतो आणि मृत्यू ओढवण्याची शक्यता सहा पटीने अधिक असते. अपघाताच्या वेळी हेल्मेट थेट डोक्यावर होणारा आघात शोषून घेते, त्यामुळे डोक्याची कवटी फुटणे आणि मेंदूला होणारे प्राणघातक नुकसान टाळता येऊ शकते. यावेळी खालापूरचे पोलीस निरीक्षक सचिन पवार, वाहतूक शाखेचे उपनिरीक्षक राजेंद्र आरोळे, पोलीस किरण शेळके, जयेश कुथे, अजित सुपेकर, शनिराजे हारजे, कोमल ओंबळे, मनीषा केंद्रे आदीनी यांनी कारवाई केली आहे.






