| रायगड | खास प्रतिनिधी |
जिल्हा परिषदेच्या पाणीपुरवठा विभागापाठोपाठ आता एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजनेतही तब्बल चार कोटी 12 लाख रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले आहे. यातील मुख्य सूत्रधार नाना कोरडे यांच्यासमवेत अन्य दोन कर्मचार्यांवर अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नाना कोरडे, जेतिराम वरुडे, महेश मांडवकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत.
रायगड जिल्हा परिषदेतील पाणीपुरवठा विभागातील कर्मचार्याने कोट्यवधी रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचे प्रकरण नुकतेच समोर आले होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. भरत बास्टेवाड यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. अपहार करणारा कर्मचारी हा पूर्वी महिला व बाल विकास विभागात कार्यरत होता. त्यामुळे एकात्मिक बाल विकास सेवा प्रकल्प योजना विभागातील मागील चार वर्षांच्या आर्थिक व्यवहारांची चौकशी करण्यात आली. यातही नाना कोरडे या कर्मचार्याने चार कोटी 12 लाख रुपयांचा अपहार केल्याची बाब खातेनिहाय चौकशीत समोर आली आहे. बनावट वेतन फरकाची देयके बनवून त्यावर बाल विकास प्रकल्प अधिकार्यांच्या खोट्या सह्या करुन, ही रक्कम स्वतःच्या आणि इतर अशासकीय व्यक्तींच्या खात्यात जमा केली.
यानंतर याप्रकरणी जिल्हा परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी निर्मला कुचिक यांनी तीन कर्मचार्यांविरोधात अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. नाना कोरडे, जेतिराम वरुडे, महेश मांडवकर अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या कर्मचार्यांची नावे आहेत. पोलीस निरीक्षक किशोर साळे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. दरम्यान, अपहार प्रकरण अंगलट येण्याची जाणीव होताच नाना कोरडे यांनी दोन कोटी 23 लाख रुपयांची अपहार केलेली रक्कम एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी यांच्या खात्यात जमा केली असल्याचे पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, नाना कोरडे यांच्यावर पाणीपुरवठा विभागातील एक कोटी 23 लाख रुपयांच्या अपहारप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. उपअभियंता राहुल देवांग यांनी याबाबतची तक्रार दिली आहे. कोरडे यांनी सात कर्मचार्यांच्या नावाने वेतन फरकाची रक्कम दाखवून त्याची खोटी देयके तयार करून ही रक्कम स्वतःच्या आणि पत्नीच्या खात्यावर वळती केली होती.