। अलिबाग । प्रतिनिधी ।
युवांना रोजगार देण्याचे आमिष दाखवून सरकारने निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली. मात्र, कार्यकाळ संपल्यामुळे त्यांना पुन्हा सेवेत घेतले जात नाही. त्यामुळे रायगडसह महाराष्ट्रातील एक लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थींवर बेकारीची कुर्हाड कोसळली आहे. कार्यकाळ वाढवून देण्याबरोबरच वेतनवाढ करण्याची मागणी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी संघटनेकडून करण्यात आली आहे. दरम्यान, या संघटनेने मंगळवारी (दि. 25) शेकाप जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची भेट घेत आपल्या व्यथा सांगितल्या. यावेळी प्रशिक्षणार्थीं तथा युवकांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष आणि मी कायम आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकारीचे संकट दूर करावे, अशी मागणी चित्रलेखा पाटील यांनी केली.
आजतागयत फक्त त्यांना आश्वासने दिली जात आहेत. प्रत्यक्षात कार्यवाही मात्र रामभरोसे, अशी अवस्था त्यांची झाली आहे. सरकारच्या या दुटप्पी भूमिकेबाबत प्रशिक्षणार्थींमध्ये असंतोष निर्माण झाल्याचे चित्र पहावयास मिळत आहे.
तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू करण्यात आली. रोजगार मिळेल या आशेने रायगडसह राज्यातील एक लाखहून अधिक तरुणांनी या योजनेचा लाभ घेतला. जिल्ह्यातील ग्रामपंचायत, आरोग्य केंद्र, उपकेंद्रामध्ये डाटा ऑपरेटर म्हणून मानधनावर त्यांची नियुक्ती करण्यात आली. ऑनलाईन काम करण्यापेक्षा ऑफलाईन काम देऊन या तरुणांना राबविण्याचे काम वेगवेगळ्या विभागांतून करण्यात आले. प्राथमिक आरोग्य केंद्रात बाह्य रुग्ण कक्षातील रुग्णांची तपासणी करण्यापासून सर्वच कामे युवांकडून करून घेण्यात आली. तसेच ग्रामपंचायतीमधील घरपट्टी, पाणीपट्टी तसेच इतर कामेदेखील करून घेण्यात आली. मागील चार वर्षांची प्रलंबित कामे युवांकडून करून घेऊन आता त्यांना वार्यावर सोडले आहे.
या योजनेच्या प्रशिणक्षानंतर प्रशिक्षण पूर्ण केलेले उमेदवार संबंधित उद्योग, आस्थापना यांना योग्य वाटल्यास व उमेदवारांची इच्छा असल्यास त्यांना रोजगार देण्याच्या दृष्टीने संबंधित आस्थापना निर्णय घेऊ शकतात. मात्र, सरकारकडूनच युवांना वेतन मिळणार नसल्याने त्यांना कामावर कसे ठेवणार, असा प्रश्न वेगवेगळ्या आस्थापनांना झाला आहे. सरकारच्या या भूमिकेबाबत युवांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. ही योजना बंद पडून देणार नाही, असे आश्वासन तत्कालीन मुख्यमंत्री यांनी दिले होते. मात्र, कार्यरत असलेल्या युवांच्या रोजगाराचा कार्यकाळ वाढविणार नसल्याचे यावरून दिसून येत असल्याचा आरोप प्रशिक्षणार्थींनी केला. तुटपुंज्या मानधनात राबवून सरकारने युवांची थट्टा केली आहे. त्यामुळे युवावर्गात सरकारच्या भूमिकेबाबत नाराजी पसरली आहे. निवडणुकीपूर्वी रोजगाराचे आमिष दाखवून आता बेकार करण्याचा घाट सरकारने घातल्याचे बोलले जात आहे.
तरुणांनी शेकापच्या चित्रलेखा पाटील यांची भेट घेतली
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत काम करणार्या 18 ते 35 वयोगटातील तरुणांवर बेकारीची कुर्हाड आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील अनेक तरुणांनी मंगळवारी शेकापच्या जिल्हा महिला आघाडी प्रमुख चित्रलेखा पाटील यांची शेतकरी भवन येथील कार्यालयात भेट घेतली. त्यांच्याकडे गार्हाणे मांडले. तरुणांची व्यथा ऐकून सरकारच्या कारभाराबाबत चित्रलेखा पाटील यांनी नाराजी व्यक्त केली. प्रशिक्षणार्थीं तथा युवकांच्या पाठीशी शेतकरी कामगार पक्ष आणि मी कायम आहे. सरकारने त्यांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशिक्षणार्थींच्या प्रश्नाकडे गांभीर्याने लक्ष देऊन बेकारीचे संकट दूर करावे, अशी मागणी केली जात आहे.
मागण्यांवर दृष्टीक्षेप
प्रशिक्षणार्थींच्या कामाचा कार्यकाळ वाढवावा.
शासकीय सेवेत 15 टक्के जागा आरक्षित ठेवाव्यात.
मासिक वेतनात मुबलक वाढ करावी.
विद्या वेतन वेळेवर देण्यात यावे.
राज्यात एक लाखाहून अधिक प्रशिक्षणार्थी असून, रायगड जिल्ह्यात एक हजार 600 हून अधिक लाभार्थी आहेत. सरकारने कार्यकाळ वाढवून द्यावा, वेतनात वाढ करावी, अशी आमची मागणी आहे. सरकारने तरुणांच्या मागण्यांकडे लक्ष द्यावे.
ऋषीकेश पवार,
अध्यक्ष, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिणार्थी जिल्हा संघटना