| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
पालिकेचे सन 2025-2026 चे 3873 कोटी 86 लाखाचे कोणतीही करवाढ नसलेले अंदाजपत्रक मंगळवारी (दि.25) मुख्य लेखा व वित्त अधिकारी मंगेश गावडे यांनी प्रशासकीय स्थायी समितीच्या बैठकीमध्ये आयुक्त तथा प्रशासक मंगेश चितळे यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी बोलताना आर्थिक वर्षात उत्पन्न वाढीसोबतच भविष्यात पालिका हद्दीत सोयी-सुविधा पुरवण्याला प्राधान्य देणार असल्याची माहिती आयुक्त मंगेश चितळे यांनी दिली.
पालिकेच्या या अंदाजपत्रकांमध्ये महापालिका क्षेत्रातील पायाभूत सुविधाबरोबरच गतिमान प्रशासनासाठी विविध उपाययोजनांवरती भर देण्यात आला आहे. उत्पन्नवाढीवर भर देणारा, आरोग्य सुविधांची वृद्धी करणारा, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या शैक्षणिक संकल्पनांचा प्रभावी वापर करणारा, भविष्याचा दूरगामी विचार करुन नव्या जलस्रोतांचा शोध घेणारा, शहर स्वच्छ करण्यासाठी लोकसहभागावर भर देणारा, पर्यावरण संरक्षण व संवर्धन करणारा अर्थसंकल्प असल्याचे प्रतिपादन आयुक्तांनी यावेळी केले.
बांधकाम विभाग
या अर्थसंकल्पामध्ये महापालिकेच्या प्रस्तावित बांधकाम विभागाच्या कामांमध्ये स्वराज्य नविन प्रशासकीय इमारत- 158 कोटी, महापौर निवासस्थान व नविन प्रभाग कार्यालये बांधकामासाठी- रु. 38 कोटी, रस्त्यांचे कॉक्रिटीकरण व डांबरीकरण -रु. 437 कोटी, क्रिडांगणे -रु. 57 कोटी प्रस्तावित करण्यात आले आहे. खारघर येथे नगरवाचन मंदिर व नाट्यगृह व वाचनालय बांधणी करिता.14 कोटीचा निधी अंदाजपत्रकात ठेवण्यात आला आहे. याचबरोबर माता रमाबाई आंबेडकर भवन ,पुण्यश्लोक राजमाताअहिल्यादेवी होळकरसभागृह यासाठी भरीव तरतूद या अंदाजपत्रकात करण्यात आली आहे. पनवेल शहरात गाढी नदी लगत पूर प्रतिबंधक बंधारा बांधणे व पंपिग स्टेशन उभारणीसाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात 17. 50 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील कळंबोली नोड मधील होल्डींग पॉड (धारण तलाव) येथील गाळ काढणे व इतर अनुषांगिक उपाय योजना करण्यासाठी यावर्षी 35 कोटीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
यावेळी अतिरिक्त आयुक्त भारत राठोड, उपायुक्त कैलास गावडे, उपायुक्त डॉ. वैभव विधाते, उपायुक्त प्रसेनजित कारलेकर, उपायुक्त रविकिरण घोडके, सहाय्यक संचालक नगररचना अधिकारी केशव शिंदे, शहर अभियंता संजय कटेकर, मुख्य लेखा परीक्षक निलेश नलावडे, लेखा अधिकारी डॉ.संग्राम व्होरकाटे, उपमुख्य लेखापरीक्षक संदिप खुरपे, कार्यकारी अभियंता, उपअभियंता विलास चव्हाण, सहाय्यक आयुक्त स्वरूप खारगे, सहाय्यक आयुक्त डॉ.रूपाली माने, शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. राजू पाटोदकर, सर्व विभाग प्रमुख, अधिकारी उपस्थित होते.
घनकचरा व आरोग्य
यावर्षीच्या अर्थसंकल्पामध्ये पनवेल महानगरपालिकेला स्वच्छ भारत मिशनमध्ये क्रमांक मिळविण्याच्या हेतूने चार प्रभागांसाठी मेगा स्विपिंग मशीन्ससाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच धूळ नियंत्रणाकरिता विविध उपाययोजनाकरण्यासाठी 11. 38 कोटीचा निधीची तरतूद अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
वेस्ट टू एनर्जी प्रकल्प उभारणे व संचलित करणे
पनवेल महानगरपालिका सिडको प्राधिकरणासोबत कचर्यापासून ऊर्जानिर्मिती या प्रकल्पामध्ये सहभागी होत आहे. सन 2025-26 च्या अंदाजपत्रकात 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. एकूणच घनकचरा संकलन, वाहतूक व मनुष्यबळ इ कामासाठी 221 कोटीचा निधी प्रस्तावित करण्यात आला आहे.
वैद्यकीय व आरोग्य सेवा
नागरिकांना वैद्यकीय व आरोग्य सेवा पुरविण्यावर महापालिका कायमच भर देत आली असून यासाठी यावर्षी 126 कोटी रूपयांचा निधी या अंदाजपत्रकात ठेवण्यात आला आहे. याबरोबर पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये हिरकणी माता व बाल संगोपन केंद्र -सर्व समावेशक 450 बेडचे हॉस्पीटल उभारणीसाठी यावर्षीच्या अंदाजपत्रकात रु.17.50 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. काळुंद्रे, नविन पनवेल, खारघर येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे( णझकउ) बांधकाम प्रगतीपथावर आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील प्रभाग समिती ब. कळंबोली येथे 50 बेडचे हॉस्पोटल बांधण्याकरिता 10 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
अग्निशमन व सुरक्षा व्यवस्थापन-रु. 39 कोटी निधीची तरतूद
पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभागासाठी 01 नग अॅडव्हान्स फायर इंजिन व 01 नग अॅडव्हान्स इमरजन्सी रेस्क्यू टेंडर अशी 2 वाहने तसेच टर्नटेबल लेंडर 22 मीटर ,वाहन बॉडी बांधणी व पुरवठा करण्यात आले आहे. तसेच वॉटर बाउझर वाहन खरेदीसाठी 7.35 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका अग्निशमन विभागासाठी 70 मीटर उंचीचे अरायल लॅडर प्लॅटफॉर्म वाहन खरेदी करण्यासाठी तरतूद करण्यात आली आहे. तसेच कामोठे येथे अग्निशमन केंद्र बांधणे 17 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
भुयारी गटार व मलनिःसारण-रु. 178 कोटीची तरतूद
पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कामोठे मलनिःसारण केंद्रांतर्गत 15 दललि क्षमतेचे पाणी पुर्नवापर प्रक्रिया केंद्र उभारणीसाठी सन 2025-26च्या अंदाजपत्रकात तरतूद रु.40 कोटी करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील से. 19, 20, 21 करिता 6.5 दललि क्षमतेचे मलनिःसारण केंद्र उभारणीसाठी 25.49 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.
शाळा व अनुषंगिक कामे
नूतन शाळा बांधकामासाठी 34 कोटीची तरतूद करण्यात आली आहे. मनपा शाळांना शैक्षणिक सोयी-सुविधा, शिक्षक वेतन तसेच विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य वाढीसाठी 83 कोटीची भरीव तरतूद करण्यात आली आहे. पनवेल महानगरपालिका हद्दीतील रायगड जिल्हा परिषदेने बांधलेल्या शाळेची दुरुस्ती करण्यासाठी 10.72 कोटीचा निधी अंदाजपत्रकात ठेवण्यात आली आहे.
शहारातील प्रमुख चौक, प्रवेशद्वार, कार्यालय सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये महिलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिने तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी व व्यापक जनहितार्थ मुलभूत उपाययोजना करणे काम प्रगतीपथावर आहे. यासाठी 2025-26 च्या अंदाजपत्रकात रु. 107 कोटीची तरतूद करण्यात आली आहे.