तीन दिवस झिराडमध्ये रंगणार कबड्डी

। अलिबाग । विशेष प्रतिनिधी ।
अलिबाग तालुक्यातील झिराड येथील साई क्रीडा मंडळ, महिला मंडळाच्यावतीने जिल्हास्तरिय कबड्डी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. 28 एप्रिलपासून 30 एप्रिलपर्यंत तीन दिवस येथील मैदानावर कब़ड्डीचे सामने रंगणार आहे. प्रो कबड्डीच्या धर्तीवर आयोजित या कबड्डी स्पर्धांचा आनंद प्रत्यक्षात व घरबसल्या ऑनलाईनद्वारेही अलिबागकरांसह रायगडकरांना घेता येणार आहे. रायगड जिल्हा परिषद माजी समाजकल्याण सभापती दिलीप भोईर यांच्या पुढाकाराने ही स्पर्धा घेण्यात येणार आहे. कबड्डी स्पर्धेत जिल्हा स्तरिय महिला गट, पुरुष गट, अलिबाग – रेवस पंचक्रोशी गट, सागरगड पंचक्रोशी गट व बामणगाव पंचक्रोशी पुरुष गट अशा वेगवेगळ्या गटांमध्ये स्पर्धा भरविली जाणार आहे. या स्पर्धांमध्ये व 50 हजारांपासून 10 हजार रुपयांपर्यंत बक्षीस ठेवण्यात आले आहेत. तसेच उत्कृष्ट पक्कड, उत्कृष्ठ चढाई, सर्वेात्कृष्ठ खेळाडू, व पब्लिक हिरो या खेळाडूंना सन्मानित केले जाणार आहे. पहिल्या दिवशी 28 एप्रिल रोजी 32 संघ, 29 एप्रिल रोजी 48 संघ व शेवटच्या दिवशी 30 एप्रिल रोजी 32 संघ खेळणार आहेत. या ठिकाणी दोन मैदान असणार असून सुमारे 6 हजार प्रेक्षक बसून स्पर्धा बघतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच ही स्पर्धा संध्याकाळी पाचनंतर सुरु केली जाणार आहे. त्यामुळे विद्यूत प्रकाश झोतात कबड्डीचा खेळ प्रेक्षकांना बघता येणार आहे.

Exit mobile version