रिलायन्स विरोधात कडसुरे ग्रामस्थ आक्रमक

। नागोठणे । वार्ताहर ।
रिलायन्सच्या नागोठणे युनिट अंतर्गत कडसुरे गावाच्या हद्दीत प्रस्तावित सौर ऊर्जा प्रकल्पासाठी संबंधित जागेवरील झाडे तोडण्याचे काम सुरु आहे. यासाठी कंपनी व्यवस्थापनाने गावातीलच दोन ठेकेदारांना हाताशी घेतले आहे. प्रकल्पाच्या बाबतीत कंपनीने ग्रामस्थांना विश्‍वासात घेतलेले नाही. हे काम ठेकेदारांनी न थांबविल्यास, तसेच व्यवस्थापनाला सादर केलेल्या 17 प्रमुख मागण्यांवर चर्चा करण्यासाठी गाव कमिटीशी तातडीने बैठक न घेतल्यास रिलायन्स व्यवस्थापनाविरोधात उग्र आंदोलन छेडले जाईल, असा इशारा कडसुरे ग्रामस्थांच्या गाव बैठकीत देण्यात आला आहे. कडसुरे गावातील हनुमान मंदिरात बुधवारी (दि.27) सायंकाळी संपन्न झालेल्या या गाव बैठकीला गाव कमिटीतील अरुण शिर्के, दिलीप शिंदे, महेश शिंदे, विकास शिंदे, दत्तात्रेय शिंदे, भालचंद्र शिर्के, दिनेश हि. शिर्के, रमेश शिर्के, राजेंद्र शिंदे, रवींद्र शिर्के, तेजेश शिर्के, यशवंत शिर्के, काशीराम गव्हंडकर आदींसह ग्रामस्थ यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रकल्पासंदर्भात कंपनी व्यवस्थापनाशी चर्चा करण्याचा अधिकार फक्त गाव कमिटीला राहील. कडसुरे ग्रामपंचात बॉडीचा यामध्ये कोणताही हस्तक्षेप राहणार नाही, असा ठराव अरुण शिर्के यांनी मांडला. त्यास सर्व ग्रामस्थांनी एकमुखी पाठिंबा दिला. या बैठकीस उपस्थित असलेले ठेकेदार ए.व्ही. इंटरप्रायजेसचे मालक राजेंद्र शिंदे व साई इंटरप्रायजेसचे मालक समाधान शिंदे यांना हे काम तात्काळ थांबविण्यासाठी गाव कमिटीच्या वतीने पत्र देण्यात आले. हे पत्र लगेच व्यवस्थापनाला दाखवून नंतर त्यांच्या सूचनेनुसार पुढील निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी राजेंद्र शिंदे यांनी स्पष्ट केले. त्यासाठी त्यांना एक दिवसाची मुदत देण्यात असल्याचे गाव कमिटीने स्पष्ट केले व काम बंद केले नाही तर होणार्‍या परिणामास सर्वस्वी ठेकेदार जबाबदार असतील, असा इशाराही यावेळी गाव कमिटी व ग्रामस्थांकडून ठेकेदारांना यावेळी देण्यात आला.

Exit mobile version