कडूंचा काँग्रेस उमेदवाराला पाठिंबा

| मुंबई | वृत्तसंस्था |

अमरावती लोकसभा मतदार संघात महायुतीविरोधात भूमिका घेणारे प्रहार जनशक्ती पक्षाचे नेते बच्चू कडू यांनी महायुतीवर आणखी एक प्रहार केला आहे. अमरावतीमध्ये भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्याविरोधात प्रहार पक्षाकडून दिनेश बुब यांना उमेदवारी दिली आहे. बच्चू कडू त्यासाठी जोमाने प्रचाराला लागले आहेत. भाजप उमेदवार नवनीत राणा यांच्यावर रोज तीव्र शाब्दीक हल्ले ते करत आहेत. आता आणखी एक प्रहार कडू यांनी केला आहे. रामटेकमध्ये काँग्रेसचे उमेदवार श्याम कुमार बर्वे यांना पाठिंबा बच्चू कडू यांनी दिला आहे. यामुळे महायुतीमध्ये सर्व अलबेल नसल्याचा संदेश पुन्हा गेला आहे.

नवनीत राणा यांना अमरावतीमध्ये उमेदवारी दिल्यावरुन बच्चू कडू नाराज आहेत. त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन प्रहार पक्षाच्या कार्यकर्त्यांची भावना मांडली होती. प्रसंगी महायुतीतून बाहेर पडू पण नवनीत राणांसाठी मत मागणार नाही, असे बच्चू कडू यांनी म्हटले होते. अमरावतीमध्ये नवनीत राणा यांना भाजपने लोकसभेचे उमेदवारी दिल्यावरून नाराज असलेल्या बच्चू कडूंनी आता रामटेक लोकसभा मतदारसंघात काँग्रेसला समर्थन जाहीर केले. म्हणजे बच्चू कडू भाजपशी जुळवून घेणार नाही, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले आहे.

Exit mobile version