शेकडो गावांना प्रदुषणाचा फटका
| माणगाव | सलीम शेख |
सह्यादीच्या पर्वत रांगातून माणगाव तालुक्यातून उगम पावलेल्या काळ, गोद, कुंडलिका या निसर्ग निर्मित नद्यांचे पाणी शुद्ध असून या नद्या बारमाही खळखळ वाहतात. या नद्यांवर व नद्यांच्या परिसरात शेकडो गावे उभी आहेत. या नागरिकांची बारमाही शुद्ध पाणी पुरवठा करून तहान भागविण्याचे काम करतात. तालुक्यातील वाढते औद्योगिकरण त्याचबरोबर शहरीकरण व नागरीकीकरण याचा या नदीला चांगलाच फटका बसत आहे. या नागरिकीकरणामुळे नद्यांचे पावित्र्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. याला सर्वच नागरिक जबाबदार असून याकडे गांभीर्याने समाज पाहत नाही. या नदीच्या वाढत्या प्रदूषणाला आळा न घातल्यास ती भविष्यात पाण्यासाठी काळ ठरेल. अशी स्थिती आता उद्भवू लागली असून तालुक्यातील शेकडो गावांना या प्रदुषणाचा फटका बसत आहे.
तालुक्यात उगम पावणारी कुंभे ते गोरेगाव असा प्रवास करणारी काळनदी ही सुमारे 75 किमीचा प्रवास करून वाहते. तर दुसरी कुंडलिका नदी ही तालुक्यातील भिरा येथे सह्याद्रीच्या कुशीतून उगम पावते ती पुढे रोहा तालुक्यात प्रवास करते. तिसरी गोदनदी तीचा संगम जुने माणगाव येथे काळ नदीवर होतो. या तिन्ही नद्या तालुक्यातील अनेक गावांची तहान भागवत आहेत. तालुक्यातील विळे-भागाड औद्योगिकीकरणामुळे शहरीकरण वाढत आहे. त्यामुळे नागरिकीकरण ही झपाट्याने वाढत आहे. या वाढत्या नागरिकीकरण व औद्योगिकीकरणाला पाणीही तितकेच लागत आहे. नदीच्या परिसरात असणार्या गावातील नागरिकांकडून या नद्या दुषित होत आहेत. याचा फटका सर्वांनाच बसत आहे. अनेक गावांच्या जलवाहिन्या नळपाणी पुरवठा योजना या नदीवर कार्यान्वित आहेत. मराठवाड्यासह राज्यात अनेक ठिकाणी पाण्याचे दुर्भाक्ष असतांना कोकणामध्ये पाण्याला सुकाळ आहे. मात्र हे निसर्गनिर्मित पाणी अनेक ठिकाणी दुषित होऊन नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे.
विविध गावातील वाढते नागरीकीकरण, शहरीकरण, व्यापारीकरण, औद्योगिकीकरण या विविध कारणामुळे दुषित पाणी तसेच मुलमुत्र, गटारे यांचे पाणी या नदीत सोडले जात असल्याने ही गोडी नदी दिवसेंदिवस दुषित होत आहे. या प्रदुषणाचा फटका आता नागरिकांना बसत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य दिवसेंदिवस धोक्यात येत आहे. कावीळ, अतिसार, मलेरिया, डेंग्यू तसेच विविध जीवघेणे रोगाचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य कमी होत आहे. नुसती तहान नाही तर या नदीवर मोठया प्रमाणात मच्छिमारी ही केली जाते. अनेक खवय्ये खार्या समुद्राच्या पाण्यातील मच्छी पेक्षा याच गोड्या पाण्यातील मच्छीला अधिक पसंदी देतात. त्यामुळे या मच्छीमारामुळे ही नदी प्रदूषित होत आहे. माणगाव तालुक्यात बारमाही वाहणार्या काळ नदीमध्ये प्रचंड प्रमाणात जलप्रदूषण झाले असल्याने या पाण्यावर अवलंबून असलेल्या 70 गावातील नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
काळ नदीवरील गावे
कुंभे येथून गोरेगाव पर्यंत ही नदी कुंभे, मांजरवणे, कांडेथर, साखल्याची वाडी, जिते, उंबर्डी, शिरवली, येलावडे, येरद, कडापे, कांदळगाव, कांदळगाव बुद्रुक, बोंडशेत, भाले, कोशींबळे, कडापेवाडी, चांदेवाडी, पाणस्पे, निजामपूर, कोस्ते बुद्रुक, मांडवकरवाडी, कोस्तेखुर्द, पाणोसे, साळवा, उतेखोल, भादाव, माणगाव, रिळे, पाचोळे, वावे, उणेगाव, कुंभार्ते, गांगवली गोरेगाव.
गोद नदीवरील गावे
इंदापूर, वाढवण, पानसई, मुठवली, कालवण, दाखणे, नाणोरे, कोशिंबळे, तिलोरे, कळमजे, बामणोली, निळगुण, जुने माणगाव.
कुंडलिका नदीवरील गावे
भिरा, पाटणूस, लवेची वाडी, रवाळजे, विळे, विळे-भागाड औद्योगिकीकरण यासह अनेक गावे व वाड्यांची व वस्त्यांना पाणी पुरवठा होतो.