महिलांचा सिडको कार्यालयावर मोर्चा
| पनवेल | विशेष प्रतिनिधी |
कळंबोली परिसरात गेल्या काही दिवसांपासून गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर के.एल.-1, सेक्टर 5-ई आणि आसपासच्या भागातील महिलांनी मनसेच्या जिल्हा सचिव स्नेहल बागल यांच्या नेतृत्वाखाली सिडको कार्यालयावर धडक मोर्चा काढून प्रशासनाचा निषेध व्यक्त केला.
शनिवारपासून परिसरात कमी दाबाने तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. अनेक ठिकाणी पिण्यासाठीही स्वच्छ पाणी उपलब्ध नसल्याची तक्रार नागरिकांनी केली. संतप्त महिलांनी गढूळ व दुर्गंधीयुक्त पाण्याच्या बाटल्या दाखवत सिडकोच्या पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. यावेळी स्नेहल बागल यांनी सिडकोचे पाणीपुरवठा अभियंता प्रफुल देवरे यांना धारेवर धरत तात्काळ स्वच्छ व सुरळीत पाणीपुरवठा सुरू करण्याची मागणी केली. नागरिकांना पिण्यायोग्य स्वच्छ पाणी मिळाले नाही तर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान, संध्याकाळपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल, असे आश्वासन सिडकोचे पाणीपुरवठा अभियंता प्रफुल्ल देवरे यांनी दिले. मात्र, तसे न झाल्यास उद्या कळंबोलीतील महिलांच्या सहभागाने सिडको कार्यालयावर हंडा मोर्चा काढण्यात येईल, असा इशारा स्नेहल बागल यांनी दिला.







