पाणी कपातीने कळंबोलीला पछाडले

ऐन पावसाळ्यातच भीषण पाणीटंचाई; परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती

| पनवेल | विशेष प्रतिनिधी |

खारघर, कामोठे, नवीन पनवेलसह सिडकोच्या अनेक वसाहतींमध्ये वर्षानुवर्षे पाण्याची बोंब सुरू असताना कळंबोली मात्र या समस्येला काही प्रमाणात अपवाद ठरली होती. मात्र, आता पाणी कपातीच्या भुताने कळंबोलीलाही पछाडले असून, ऐन पावसाळ्यात पहिल्यांदाच वसाहतीतील नागरिकांना भीषण पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे.

गेल्या काही दिवसांपासून कळंबोलीतील विविध भागांमध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असल्याने घरगुती गरजा भागविण्यासाठी नागरिकांना मोठी कसरत करावी लागत आहे. काही भागांत पाणी येण्याची वेळही निश्चित राहिलेली नसल्याने नागरिकांना पाणी साठवून ठेवावे लागत आहे. कळंबोलीत यापूर्वीही अधूनमधून पाणीपुरवठ्याच्या समस्या निर्माण होत होत्या. मात्र, त्या तुलनेने किरकोळ स्वरूपाच्या होत्या. आता मात्र या समस्येचे प्रमाण वाढल्याचे स्थानिक नागरिक सांगत आहेत. विशेष म्हणजे पावसाळ्यातही पाणीटंचाईची झळ बसत असल्याची माहिती नागरिकांनी दिली आहे.
सिडकोने नियोजनबद्ध वसाहत म्हणून कळंबोलीचा विकास केला. मात्र, वाढती लोकसंख्या, वाढत्या गृहसंकुलांची संख्या आणि त्यानुसार पाणीपुरवठ्याचे नियोजन झाले नसल्यास भविष्यात परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होत आहे. त्यामुळे “ऐन पावसाळ्यात पाणी कमी पडत असेल, तर उन्हाळ्यात काय परिस्थिती होणार?” असा सवाल संतप्त कळंबोलीकरांकडून उपस्थित केला जात आहे. तसेच, पाणीपुरवठ्यातील त्रुटी तातडीने दूर करून नागरिकांना नियमित आणि पुरेशा दाबाने पाणी उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी देखील कळंबोलीकरांकडून होत आहे.

पाणीटंचाईचे संकट गडद
सिडकोच्या इतर वसाहतींमध्ये नेहमीच पाणीटंचाईची ओरड असते. मात्र, कळंबोली तुलनेने त्याला अपवाद होती. आता कळंबोलीतही पाणीटंचाईचे संकट गडद होत असल्याने सिडकोच्या पाणीपुरवठा नियोजनावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वाढते गृह प्रकल्प तसेच जुन्या झालेल्या जलवाहिन्या बदलणे, याचे नियोजन योग्य रीतीने केल्यास कळंबोली वसाहतीला भेडसावणारी पाण्याची समस्या निश्चितच दूर होऊ शकेल. याकरता प्रशासनाने काम करणे गरजेचे आहे.

रामदास शेवाळे,
नगरसेवक

सध्या ज्या पद्धतीने नागरिक अपुऱ्या पाण्याच्या समस्येला सामोरे जात आहेत, अशी समस्या कळंबोळी वसाहतीत कधीही जाणवत नव्हती. मात्र, यावेळी पावसाळ्यात देखील ही समस्या जाणवत असल्याने उन्हाळ्यात काय परस्थिती होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

संतोष गुरव,
स्थानिक
Exit mobile version