| पाली/गोमाशी | वार्ताहर |
रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने जय हनुमान क्रीडा मंडळ यांच्यावतीने पाली व कोलाड विभागातील आमंत्रित संघात भव्यदिव्य आमदार चषक कबड्डी स्पर्धेचे आयोजन शनिवार, दि. 25 रोजी करण्यात आले होते. या स्पर्धेत अंतिम सामन्यात नाथभैरव झाप या संघास कालभैरव आपटवणे या संघाने पराभूत करून आमदार चषकावर आपली मोहोर उमटवली. या स्पर्धेसाठी प्रमुख पाहुणे म्हणून आ. भरत गोगावले उपस्थित होते. स्पर्धेत पाली व कोलाड विभागातील नामवंत संघांना आमंत्रित करण्यात आले होते.
या स्पर्धेत क्रीडा रसिकांना अटीतटीच्या लढती पाहण्यास मिळाल्या. आपटवणे या अंतिम विजयी संघास रोख रक्कम 10 हजार रु व चषक, तर उपविजेता मानकरी झाप या संघास रोख रक्कम 7 हजार रु व चषक, तृतीय क्रमांक कालभैरव नांदगाव संघास रक्कम 5 हजार रु व चषक, चतुर्थ क्रमाक गावदेवी बाहे या संघास रोख रक्कम 4 हजार रु व चषक देऊन मंडळाच्या वतीने गौरविण्यात आले. या स्पर्धेतील स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडू सुमित मोरे (आपटवणे), उत्कृष्ट चढाई यश सितापराव (झाप), उत्कृष्ट पक्कड विशाल कथल (बाहे), पब्लिक हिरो राज खैरे (नांदगाव) या खेळाडूंना चषक देऊन सन्मानित करण्यात आले.