उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकऱ्याचा अनोखा प्रयोग
| पाली | वार्ताहर |
समाज माध्यमाचा कोणी कसा वापर करेल याचा काही नेम नाही. मात्र सुधागड तालुक्यातील उद्धर येथील प्रयोगशील तरुण शेतकरी तुषार केळकर हे समाज माध्यमांचा वापर करून कलिंगड विकत आहेत. यातून भरघोस उत्पन्न देखील मिळवत आहे. विशेष म्हणजे अवघ्या पाच गुंठ्यांत सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या कलिंगडाचे बंपर उत्पादन मिळाले आहे. तुषार यांनी अवघ्या पाच गुंठ्यांत सेंद्रिय पद्धतीने कलिंगड लागवडीचा हा प्रयोग करून जवळपास 500 ते 700 कलिंगडाचे उत्पादन काढले आहे.
एवढा माल चांगल्या भावाने विकावा कसा हा प्रश्न त्यांच्यासमोर होता. कारण दलाल व व्यापारी अतिशय पाडून भाव देतात. शेतकऱ्यांची सगळ्यात मोठी विवंचना ही आहे. तसेच महत्त्वाचं कारण विकण्याची व जाहिरातीची योग्य साधने नाहीत आणि त्यामुळे दलालांचे फावते, ते म्हणतील त्या किंमतीमध्ये शेतकऱ्यांना माल द्यावा लागतो. यावर उपाय म्हणून समाज माध्यमांचा वापर करून शेतकऱ्यांना स्वतःच्या मालाची विक्री करून हाती चांगले उत्पन्न मिळायला हवे असे तुषार यांना वाटत होते. मग तुषारने विविध व्हॉट्सअप ग्रुपवर आणि फेसबुकवर आपल्या कामाची आणि सेंद्रिय पद्धतीने केलेल्या कलिंगडाची माहिती पोस्ट केली. कलिंगडाचे फोटो व वैशिष्ट्ये सांगितली. यामुळे उत्तम प्रतिसाद मिळत असून खूप ऑर्डर येत आहेत. कलिंगड साधारणपणे 50 आणि 100 रुपये अशी विक्री करत आहेत. सुधागड तालक्यात घरपोच सेवा देत आहेत. अगदी पुणे व मुंबई येथून देखील ऑर्डर येत आहेत असे तुषार केळकर यांनी सांगितले.
अशी केली लागवड आत्मतृप्ती या आपल्या कृषी पर्यटन केंद्रावर 5 गुंठे जागा ट्रॅक्टरने नांगरून घेतली. त्यानंतर शेणखत टाकले. रोपे लावण्यासाठी हातानेच आळे बनविले. साधारण 500 रोपे लावली. यामध्ये चायनीज व स्थानिक जातीची कलिंगडाची रोपे आहेत. रोपांना पाणी पाटाद्वारे दिले. सौर ऊर्जेचा वापर करून मोटर द्वारे पाणी आणले. रोपांना शेणखत, गांडूळखत, पोटॅश, पेंढ व अमृतपाणी याचा सुयोग्य वापर केला. योग्य मशागत, सेंद्रिय खते यामुळे चांगले उत्पादन आले. शिवाय रासायनिक खते किंवा कीटकनाशके फवारली नाहीत.
चांगले उत्पन्न मशागत, बियाणे, सेंद्रिय खते असं सर्व मिळून साधारण सात हजार रुपये खर्च झाला. सर्व कलिंगड विकून साधारण चौदा ते पंधरा हजार रुपये हाती येतील. म्हणजे खर्च वजा करता उत्पन्न सात ते आठ हजार मिळेल. अवघ्या दोन ते अडीच महिन्यात पाच गुंठ्यांत मिळालेले हे उत्पादन व उत्पन्न फायद्याचे आहे.
तुषार यांची कलिंगडाची पोस्ट मी फेसबुक व व्हाट्सअप ग्रुपवर पहिली. आणि कलिंगड मागवून घेतले. सेंद्रिय पद्धतीने पिकवलेली ही कलिंगडे गोड व पौष्टिक आहेत.
धनंजय गद्रे, पाली
