| रसायनी | प्रतिनिधी |
खालापूर तालुक्यातील कलोते येथून रयती गावाकडे जाणाऱ्या पुलाची अवस्था सध्या धोकादायक बनली आहे. पुलाला संरक्षक कठडे नसल्याने या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. पुलाखालील लोखंडी सळ्या बाहेर आल्याने पुलाच्या सुरक्षिततेबाबतही चिंता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे संबंधित प्रशासनाने या पुलाची तातडीने पाहणी करून आवश्यक दुरुस्ती करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.
या पुलावरून रयती गावाच्या हद्दीतील व्यसनमुक्ती केंद्र, फार्म हाऊस तसेच आदिवासी वाड्यांमधील नागरिक आणि आसपासच्या परिसरातील ग्रामस्थांची नियमित ये-जा सुरू असते. त्यामुळे हा पूल परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाचा दळणवळणाचा मार्ग आहे. मात्र, पुलाला संरक्षक कठडे नसल्याने वाहनचालकांना विशेष काळजी घेऊन प्रवास करावा लागत आहे. रात्रीच्या वेळी तसेच पावसाळ्यात या मार्गावरून प्रवास करताना धोका अधिक वाढण्याची शक्यता आहे.
पुलाखालील लोखंडी सळ्या बाहेर आल्याने पुलाच्या बांधकामाची स्थिती तपासणे आवश्यक आहे. वेळीच दुरुस्ती न झाल्यास भविष्यात गंभीर दुर्घटना घडण्याची भीती नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे. संबंधित सार्वजनिक बांधकाम विभाग अथवा जबाबदार यंत्रणेने पुलाची तांत्रिक तपासणी करून त्याची सुरक्षितता निश्चित करावी. पुलाला मजबूत संरक्षक कठडे बसवावेत, बाहेर आलेल्या लोखंडी सळ्यांची दुरुस्ती करावी आणि आवश्यकतेनुसार पुलाचे मजबुतीकरण करावे, अशी मागणी होत आहे.
कलोते-रयती पुल धोकादायक स्थितीत
