कमळ पतसंस्था कर्मचारी क्रिकेट स्पर्धा

कमळ रायडर्सने पटकावले विजेतेपद

| अलिबाग | वार्ताहर |

कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या सहकार्याने कमळ नागरी सहकारी पतसंस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या क्रिकेट स्पर्धेचे आयोजन रविवार, दि. 24 डिसेंबर रोजी नेहुली-अलिबाग येथील जिल्हा क्रीडा संकुलात करण्यात आले होते. संस्थेच्या 15 शाखा व प्रधान कार्यालयातील कर्मचाऱ्यांच्या पाच संघांनी स्पर्धेचे प्रतिनिधीत्व केले. या स्पर्धेत कमळ रायडर्सने विजेतेपदावर नाव कोरले.

प्रारंभी या स्पर्धेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सतीशचंद्र पाटील यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आले. 4-4 षटकांचे सामने खेळविण्यात आले. या स्पर्धेचा अंतिम सामना कमळ रायडर्स आणि कमळ स्ट्रायकर्स या संघांमध्ये झाला. अटीतटीच्या सामन्यात कमळ रायडर्सने कमळ स्ट्रायकर्सवर मात करीत विजेतेपद पटकावले. या स्पर्धेचा मालीकावीर व सामनावीर म्हणून मनेष भोनकर यांना गौरविण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून गणेश लदगे, तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून पुष्कर आठवले यांना गौरविण्यात आले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष गिरीश तुळपुळे, उपाध्यक्ष नंदकुमार चाळके, संचालक आनंद करंबत, श्रीनिवास पाटील, ललित भिसे, कौस्तुभ कुलकर्णी, लक्ष्मण जुंधारे, प्रदीप जोशी तसेच कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. संस्थेचे संचालक संतोष पुरव यांनी समालोचनाचे काम केले.

Exit mobile version