| चिरनेर | प्रतिनिधी |
घारापुरी बेटावरील समुद्रकिनार्यावरील अनेक कांदळवनांतील दुर्मिळ मॅन्ग्रोजची हजारो झाडे सुकून निष्पर्ण झाली आहेत. काही ठिकाणी समुद्रकिनार्यावरील झाडे उन्मळून वाहत्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर पुन्हा किनार्यावर येऊन ठेपली असल्याने वन्यजीव अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
जागतिक कीर्तीच्या घारापुरी बेटासभोवार समुद्रामुळे चारही बाजूला विविध प्रकारच्या जातींची कांदळवन मोठ्या प्रमाणावर फोफावले आहे. बेटाच्या चारही बाजुला नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कांदळवन बेटाची होणारी धूप थांबविण्यासाठी उपयुक्त ठरत आहेत. त्याशिवाय अशी ही नैसर्गिक वने वाढत्या प्रदूषणाला रोखण्यासाठी, मासळीच्या प्रजनन व विविध प्रकारच्या जैवविविधतेच्या अस्तित्वाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची बनली आहेत.
घारापुरी बेटाच्या सभोवताली असलेल्या समुद्राच्या परिसरात मागील काही वर्षांपासून उभारण्यात येत असलेल्या आणि उभारण्यात आलेल्या विविध प्रकल्पांसाठी समुद्रात मोठ्या प्रमाणावर उत्खनन करून दगड मातीचे भराव टाकण्यात येत आहे. समुद्रातील मोठ्या प्रमाणावर होत असलेल्या किंवा झालेल्या दगड मातीच्या भरावामुळे समुद्राच्या पाण्याच्या पातळीत कमालीची वाढ झाली आहे. त्याचबरोबर समुद्राचे भरतीचे पाणी भरतीची सीमा ओलांडून 25 ते 30 मीटर आत घुसले आहे. याचा विपरीत परिणाम बेटाच्या चारही बाजूला नैसर्गिकरित्या तयार झालेल्या कांदळवनावर होऊ लागला आहे. मागील काही वर्षांपासून तर घारापुरी बेटावरील समुद्र किनार्यावरील अनेक कांदळवनातील दुर्मिळ मॅन्ग्रोजची शेकडो झाडे सुकून निष्पर्ण होत असल्याची चित्र पाहायला मिळत आहे. बेटावरील अशा उद्भवलेल्या चिंताजनक परिस्थितीमुळे वन्यजीव अभ्यासकांकडून चिंता व्यक्त केली जात आहे.
घारापुरी बेटावरील समुद्र किनार्यावरील कांदळ वनातील झाडे उष्मा काळात सुकून, निष्पर्ण होत असल्याचे मागील काही वर्षांच्या निरीक्षणातून आढळून आले आहे. याबाबत संबंधित व पर्यावरण विभागाच्या तज्ज्ञांशी चर्चा करून नेमक्या कारणांचा अभ्यास व शोध घेण्यासाठी संपर्क साधण्यात आला आहे.
नथुराम कोकरे,
वनक्षेत्रपाल,
उरण