| बीड | प्रतिनिधी |
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख खून प्रकरणात सीआयडीने 1800 पानांचे आरोपपत्र दाखल केले असून वाल्मीक कराड हाच खरा सूत्रधार असल्याचे यात नमूद करण्यात आले आहे. आवादी कंपनीकडून खंडणी उकळण्यात अडथळा ठरत होता म्हणून संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आल्याचे सीआयडीने आरोपपत्रात म्हटले आहे. तसेच खंडणी, अॅट्रॉसिटी आणि हत्या या तीनही घटनांचा आरोपपत्रामध्ये एकत्रित उल्लेख करण्यात आला आहे. सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रामध्ये वाल्मीक कराड पहिल्या नंबरचा आरोपी आहे. विष्णू चाटे दुसर्या, सुदर्शन घुले तिसर्या, प्रतिक घुले चौथ्या, सुधीर सांगळे पाचव्या, महेश केदार सहाव्या, जयराम चाटे सातव्या करत फरार कृष्णा आंधळे आठव्या नंबरचा आरोपी आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्यापासून कृष्णा आंधळे फरार आहे. पोलीस, सीआयडी पथकाकडून त्याचा शोध सुरू आहे. मात्र, हे हत्याकांड घडून 70 दिवस झाले तरी तो हाती लागलेला नाही.