| उरण | वार्ताहर |
उरण तालुक्यातील शाळा, कॉलेजमध्ये शिकणार्या विद्यार्थ्यांचा अमली पदार्थांच्या विळख्यात अडकत चालल्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शाळा, महाविद्यालयांच्या 500 मीटर परिसरात तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करण्यास मनाई असताना, सर्रास विक्री होत असल्याने तरुणाई नशेच्या आहारी जाऊन त्यांचे आयुष्य उद्ध्वस्त होत आहे. याविषयी सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरणच्या आमसभेतही आवाज उठवला आहे. दरम्यान, तस्करीचे रॅकेट तोडून काढण्याचा प्रयत्न असल्याचे उरण पोलिसांनी सांगितले. तर, आजची तरुणाई देशाचे उद्याचे भविष्य असून, त्यांना वाईट मार्गापासून रोखण्यासाठी शाळा परिसरातील धंद्यांची माहिती घेऊन कारवाई करण्यास भाग पाडू, असे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.
उरणमध्ये अंमली पदार्थ सेवन करणार्यांमध्ये शाळा, कॉलेजचे तरुण आणि तरुणींचे प्रमाण हे दिवसेंदिवस वाढत असून, ही एक गंभीर बाब समोर येत आहे. व्यसनामुळे वेगळाच आनंद मिळतो, रिलॅक्स वाटते, ताण-तणाव कमी होतो, असेही गैरसमज युवकांमध्ये आहेत. एकंदरीत, शहरातील तरुणाईबरोबर ग्रामीण भागातील तरुणाई अमली पदार्थाच्या विळख्यात सापडत चालली असल्याचे भयानक चित्र सध्या उरणातील शाळा, कॉलेज परिसरातील अडगळीच्या जागेत पाहण्यास मिळत आहे.
उरण पंचायत समितीच्या नुकत्याच पार पडलेल्या आमसभेत सामाजिक कार्यकर्ते संजय ठाकूर यांनी उरण तालुक्यातील तरुणाई विशेष करून शाळा, कॉलेजचे विद्यार्थी हे अंमली पदार्थांच्या विळख्यात सापडत जात असल्याचा गंभीर प्रश्न उपस्थित केला. तसेच, तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून बाहेर काढण्यासाठी उरणचे आमदार महेश बालदी यांनी गृह तसेच, पोलीस यंत्रणेच्या माध्यमातून ठोस उपाययोजना करण्याची मागणी ही केली. परंतु, अशा गंभीर स्वरूपाच्या प्रश्नांकडे लक्ष केंद्रित करण्याकडे पोलीस यंत्रणेबरोबर शासकीय अधिकार्यांनी दुर्लक्ष केल्याने शनिवारी (दि. 1) शाळा, कॉलेजच्या परिसरातील काही विद्यार्थी हे आपापल्या घराकडे, विद्यालयाकडे जात असताना त्यातील काही तरुणाई हे अडगळीच्या जागेत दम मारो दमच्या सुरात अंमली पदार्थ सेवन करतानाचे भयानक दृश्य समोर येत आहे.
उरण पोलीस यंत्रणेने नुकताच पागोटे गावाजवळ गांजा पकडला आहे. मात्र, पोलिसांची वेळोवेळी कारवाई होत असली तरी हे अमली पदार्थ नशेखोरांना विशेष करून तरुणाईला सहज उपलब्ध होत आहेत. शहरात अमली पदार्थांमध्ये सर्वाधिक प्रमाणात गांजा, चरस व गर्द (मॅफेडोन, हेरॉईन किंवा ब्राऊन शूगर) विकले जात असल्याची माहिती सूत्रांकडून सांगण्यात येत आहे. तरी पोलीस यंत्रणा व गृह विभागाच्या अधिकार्यांनी खोपटा उरण येथील संजय ठाकूर यांनी उरणच्या आमसभेत उपस्थित केलेल्या अंमली पदार्थांच्या प्रश्नांना वाटाण्याच्या अक्षता न दाखविता उरणच्या तरुणाईला अंमली पदार्थांच्या विळख्यातून सोडविण्यासाठी ठोस उपाययोजना करावी, अशी मागणी आता पालकवर्गाकडून करण्यात येत आहे.
गांजा, चरस यांची लपूनछपून विक्री सुरू आहे. वेळोवेळी अशा तस्करांवर धडक कारवाई करुन त्यांचा बिमोड करण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला आहे. परवाच आम्ही जवळपास दीड किलो गांजा जप्त केला आहे. यापुढेदेखील गांजा, चरस यांचे रॅकेट तोडून काढण्याचा आमचा प्रयत्न राहील.
– जितेंद्र मिसाळ, पोलीस निरीक्षक, उरण
शाळा, कॉलेजच्या परिसरात मुले सिगारेट, दारु, गुटखा यांना बळी पडली आहेत. शिक्षण विभाग आणि पोलीस यंत्रणेने याकडे जाणीवपूर्वक लक्ष देऊन शाळांना भेट देऊन मुलांमध्ये जनजागृती करावी. त्याचप्रमाणे दिवसेंदिवस वाढत असणार्या लैंगिक अत्याचाराच्या घटनांबाबतही समुपदेशन करण्याची आवश्यकता आहे.
– संजय ठाकूर, सामाजिक कार्यकर्ते
अशा घटनांमुळे तरुणाई बरबाद होण्यास वेळ लागणार नाही. याबाबत तात्काळ चौकशी करुन कारवाई करण्यात येईल. शाळा, महाविद्यालयांमध्ये जाऊन मुलांचे समुपदेशन करण्यात येईल.
– महारुद्र नाळे, शिक्षणाधिकारी, रायगड, माध्यमिक विभाग