अंतिम टप्प्यातील कामासाठी निधीची गरज
| चिरनेर | वार्ताहर |
मागील नऊ वर्षांपासून रखडत-रखडत सुरू असलेल्या करंजा मच्छिमार बंदराला 35 कोटी रुपयांचा वाढीव निधी मंजूर झाला आहे. त्यामुळे आतातरी करंजा बंदर पूर्ण होऊन सुरू होणार का, असा सवाल करंजा येथील मच्छिमार बांधव विचारू लागले आहेत.
गेली दहा-बारा वर्षांपासून करंजा प्रकल्पाचे काम सुरू आहे. सुरुवातीला शरद पवार कृषीमंत्री असताना या बंदरासाठी 67 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या काळात 149.80 कोटी या बंदरासाठी मंजूर झाले. आणि या प्रकल्पाचे काम सुरू झाले होते. मात्र, काम अंतिम टप्प्यात असताना पुन्हा निधीची कमतरता पडल्याने आता पुन्हा एकदा या शिल्लक कामाकरिता 35 कोटी रुपयांचा अतिरिक्त निधी मंजूर केला आहे. जवळजवळ 90 टक्के काम पूर्ण झालेल्या बंदराचे काम पुन्हा रखडते की काय, अशी भीती व्यक्त करण्यात येत आहे.
क्षमतेपेक्षा कितीतरी अधिक पटीने ससून डॉक बंदरात मच्छिमार बोटी येत असल्याने मोठी गर्दी होते. त्यामुळे बंदरावर मोठा ताण पडत असल्याने मच्छिमारांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते. ससून डॉक बंदरावरील वाढता ताण दूर करण्यासाठी आणि मुंबई, पालघर, ठाणे, रायगड जिल्ह्यातील मच्छिमारांना होणारा त्रास कमी करण्यासाठी रायगड जिल्ह्यातील करंजा खाडीकिनारी एक हजार मच्छिमार बोटी लागण्याच्या क्षमतेचे आधुनिक बंदर उभारण्यात येत आहे.