रस्त्यावरून प्रवास करणेे धोकादायक
।उरण । वार्ताहर ।
चाणजे ग्रामपंचायत क्षेत्रातील करंजा ते उरण रस्त्यांवर खड्डे पडल्याने रस्त्याची चाळण झाली आहे. यामुळे वाहतुकीस आणि रहदारीस मोठ्या प्रमाणात अडथळा निर्माण होत आहे. या खड्ड्यांमुळे काही काळ वाहतूक कोंडी होते.
रस्त्याचे ठेके घेतात ते हलक्या प्रतीचे मटेरियल वापरतात. त्यामुळे रस्त्यांची लवकर दुर्दशा होते. रस्ता नवीन बनवल्यानंतर एक वर्षही व्यवस्थित राहत नाही. अनेकदा तर पहिला पाऊस पडला की रस्त्यावर खड्डे पडतात आणि लोकांना त्रास सहन करावा लागतो. करंजा पंचक्रोशीतील प्रसिद्ध असलेल्या द्रोणागिरी देवीच्या मंदिरात जाण्यासाठी असलेल्या रस्त्याची गेली कित्येक वर्षांपासून दुरवस्था झालेली आहे. याकडे कोणाचेही लक्ष नाही.
एप्रिल मे महिन्यात बारीक भुसा टाकून खड्डे बुजवण्याचे काम करत रस्त्यांना मलम लावण्याचा प्रकार केला पण त्यानंतर पडलेल्या पावसामुळे रस्ते वाहून गेले आणि आता परत खड्डे दिसू लागले असून वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. या खड्ड्यांबाबत वारंवार तक्रार करूनही हे खड्डे भरले जात नाहीत. वास्तविक जो कंत्राटदार रस्ता बनवतो त्याचीच खड्डे बुजवण्याची जबाबदारी असली पाहिजे. असा सूर स्थानिकांमध्ये आहे.
हा रस्ता जिल्हा परिषदेच्या अखत्यारीखाली असून त्यांना 3 ते 4 वेळा पत्रव्यवहार करून खड्डे बुजवण्यास सांगितले आहे. रस्त्यावर खड्डे पडल्याचा जास्त त्रास रिक्षावाल्यांना होतो. खड्ड्यांमुळे कधी अपघात होईल का अशी भीती सतत भेडसावत असते. रिक्षा खड्ड्यामध्ये आपटून मोठे नुकसान होत असते. रस्त्याची ठिकठिकाणी अक्षरश: चाळण झाली आहे.
गेल्या काही महिन्यांपूर्वी या रस्त्यावर लाखो रुपये खर्च करण्यात आले होते. परंतु पावसात पुन्हा जैसे थे परिस्थिती ओढवली आहे. याबाबत ग्रामविकास अधिकारी चव्हाण यांच्याकडे विचारणा केली असतात त्यांनी हा रस्ता सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या अखत्यारीत येत असल्याचे सांगितले. तर अभियंता योगेश नागावकर यांनी सदरचा रस्ता हा जिल्हा परिषदेच्या मालकीचा असून जिओ व जलमिशन पाणीपुरवठा यांनी खोदकाम केल्याने रस्ता दुरुस्त करण्यासाठी जिल्हा परिषदेचे उपअभियंता राहुल देवांग यांच्या स्वाक्षरीचे पत्र पाठवून काही महिन्याचा अवधी उलटूनही संबंधित ठेकेदारांनी केराची टोपली दाखविली आहे.
पावसाळ्यापूर्वी ज्या ठिकाणी खड्डे पडलेले आहेत त्याच ठिकाणचे खड्डे डांबरीकरण करुन बुजविण्यात आले होते. दोन महिन्यांत पुन्हा रस्त्याची दुरवस्था झाली आहे. ज्या ठेकेदाराने हे काम केले आहे त्या ठेकेदाराची व अधिकारी वर्गाची सखोल चौकशी व्हावी.
सचिन डाऊर
सामाजिक कार्यकर्ते
