लायन्स क्लबचा स्तुत्य उपक्रम
। अलिबाग । प्रतिनिधी ।
लायन्स क्लब अलिबागतर्फे आयोजित लायन्स फेस्टिवल 2025 मध्ये हौशी व व्यावसायिक गायक कलाकारांसाठी कराओके स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यावर्षी 23 ते 27 जानेवारी 2025 दरम्यान होत असलेल्या महोत्सवात 23 जानेवारीला लायन्स अलिबाग कराओके आयडॉल स्पर्धा घेण्यात येणार आहे.
दरवर्षी जानेवारी महिना अखेरीस अलिबाग समुद्र किनारी आयोजित करण्यात येणारा लायन्स अलिबाग फेस्टिवल हा हजारो पर्यटकांसोबत स्थानिक नागरिकांच्या औत्सुक्याचा आणि आकर्षणाचा विषय असतो. गेली काही वर्षे या महोत्सवात घेतल्या जाणार्या कराओके स्पर्धेची लोकप्रियता, कलाकार आणि रसिकांमध्ये चांगलीच वाढत आहे. सोलो आणि ड्यूएट अशा दोन्ही प्रकारात घेण्यात येणारी ही स्पर्धा 15 वर्षे वयावरील सर्व हौशी तसेच व्यावसायिक कलाकारांसाठी खुली असेल. यात कोणतीही हिंदी किंवा मराठी गाणी सादर केली जाऊ शकतात. स्पर्धकाने त्यांच्या गाण्याचे कराओके डाऊनलोड ट्रॅक सोबत आणणे अपेक्षित असून या ट्रॅकच्या कायदेशीर बाबींची जबाबदारी स्पर्धकांची राहणार आहे.
सोलो परफॉर्मन्ससाठी 500 रु. तर ड्युएट परफॉर्मन्ससाठी 800 रु. प्रवेश शुल्क प्रती स्पर्धकाला असणार आहेत. स्पर्धेची एलिमिनेशन फेरी दि. 4, 5 जानेवारी रोजी घेतली जाणार आहे. यातील निवडक स्पर्धकांची अंतिम फेरी 23 जानेवारी रोजी सायंकाळी सहा ते रात्री नऊ या वेळेत लायन्स फेस्टिव्हल महाअंतिम फेरीत सत्रात होईल. अंतिम विजेत्या सोलो कराओके गायकास 15 हजार रुपये तर ड्यूएट गायकांना 10 हजार रुपये रोख पारितोषिके देण्यात येणार आहे. तसेच, दुसर्या व तिसर्या क्रमांकाच्या विजेत्यांना आकर्षक बक्षिसे दिली जाणार आहेत.
अधिक माहितीसाठी लायन्स क्लब ऑफ अलिबाग कराओके स्पर्धा समितीचे समन्वयक लायन संजय मोराणकर (750794542) आणि राजेन्द्र बोराडे (7977663451) यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.