| नागोठणे | प्रतिनिधी |
नागोठणे बाजार पेठेतील प्रतीक्षा मल्टी आर्ट स्टुडिओमध्ये दि.31 मे रोजी पार पडलेल्या कराओके गायन स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ मंगळवारी (दि.9) पीएनपी नाट्यगृहात संपन्न झाला. या समारंभात उपस्थित मान्यवरांच्या हस्ते विजेत्यांना बक्षिसे प्रदान करण्यात आली. या कराओके स्पर्धेत रायगड जिल्ह्यासह अन्य जिल्ह्यातील स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
यावेळी राजिपचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, अलिबागच्या उपनगराध्यक्षा ॲड. मानसी म्हात्रे, राजाभाऊ ठाकूर, सुरेंद्र म्हात्रे, रेवदंडाचे उपसरपंच बाबू मोरे, के.डी. पाटील, विक्रांत वार्डे, निवेदक यशवंत हारेर, महेश दळवी, सागर म्हात्रे, रोहित पाटील, योगेशकुमार, स्वरवैभव थोरवे व प्रतीक्षा शेळके यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच अनेक मान्यवर आणि नामवंत कलाकारांच्या उपस्थितीमुळे समारंभाची शोभा अधिकच वाढली. या कराओके स्पर्धेतील विजेत्या स्पर्धकांचा यावेळी विशेष गौरव करण्यात आला. त्यामध्ये प्रथम क्रमांक प्रज्ञा सावंत, द्वितीय क्रमांक सागर ठोंबरे, तृतीय क्रमांक प्रसाद उलांडे, चतुर्थ क्रमांक सुजी मॅथ्यू, पाचवा क्रमांक महेश पाटील यांना गौरविण्यात आले. याशिवाय उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून हंसिका पाटील, वैभव पोटले, आयेशा सय्यद, प्रथमेश गायकवाड यांनाही मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. सर्व विजेत्यांना मान्यवरांच्या शुभहस्ते सन्मानचिन्ह, प्रशस्तीपत्रे व पारितोषिके प्रदान करण्यात आली.
कराओकेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात
