कर्जत चारफाटा होणार बॅनरमुक्त

सुशोभिकरणासाठी दोन कोटींचा निधी उपलबध

| नेरळ | प्रतिनिधी |

कर्जत चारफाटा हा गेली काही वर्षे वाहतूक कोंडीचा आणि तेथील बॅनरचा सुळसुळाट यामुळे प्रामुख्याने चर्चेत होता. मात्र, त्याच कर्जत चारफाटा येथे असलेले बहुसंख्य बॅनरचे फलक काढण्यात सार्वजनिक बांधकाम विभागाला यश आले आहे. मात्र, त्याचवेळी या चारफाटा चौकाचे सुशोभिकरण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम खात्याने दोन कोटींची तरतूद केली आहे. दरम्यान, आमदार महेंद्र थोरवे यांचे कर्जत सुशोभित करण्याचे स्वप्न आता साकार होणार असून, प्रामुख्याने लाखो पर्यटकांचा रस्त्यामधील चौक यानिमित्ताने देखणा होणार आहे.

मुंबईपासून जवळ असल्याने गेल्या काही वर्षात कर्जत हे सर्वांचे विकेंड साजरा करण्याचे महत्त्वाचे ठिकाण बनले आहे. त्यात येथील फार्म हाऊस संस्कृती तसेच सेकंड होम यामुळे कर्जत तालुक्यात येणार्‍या पर्यटकांची संख्या मोठी आहे. त्यामुळे विकेंडच्या वेळी हजारो वाहने कर्जत तालुक्यात येत असतात. त्याचवेळी बहुसंख्य वाहने ही कर्जत चारफाटा येथून वेगवेगळ्या भागात जात असतात. त्यामुळे कर्जत तालुक्यात एकाच वेळी असंख्य वाहने आल्यानंतर तालुक्यातील अनेक रस्त्यावर वाहतूक कोंडी झालेली दिसून येते. अरुंद रस्ते असलेल्या कशेळे तसेच कडाव गावात तसेच नेरळ येथील रेल्वे फाटक आणि कल्याण कर्जत रस्त्यावर माथेरान येथील पर्यटकांच्या वाहनांची वाहतूक कोंडी तर सर्वाधिक वाहतूक कोंडी कर्जत शहरात श्रीराम पूल येथे होत असते. कर्जत चारफाटा हा वाहतूक कोंडीचा केंद्रबिंदू असून, नजीकच्या काळात त्या ठिकाणी उड्डाण पुलांचे नियोजन असल्याने कर्जत चारफाटा वाहतूक कोंडीच्या अग्रस्थानी राहिला आहे.

कर्जत चारफाटा येथे मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असल्याने जाहिरात फलकदेखील तेथील समस्या बनली होती. रस्त्याच्या चारही दिशेला जाहिरात फलक उभे होते. मात्र, घाटकोपर येथील दुर्घटना घडल्यानंतर कर्जत चारफाटादेखील सर्वांच्या नजरेस भरला होता. मात्र, त्याही स्थितीत वाहतूक कोंडीत अडकून पडलेल्या चारफाटा येथे कर्जत शहराकडे जाणार्‍या रस्त्याच्या बाजूला रस्त्याच्या दुतर्फा सुशोभिकरण करण्याचे काम सुरु झाले आहे. कर्जत चारफाटा येथील वाहतूक कोंडी दूर झाल्यास त्या चौक सुशोभिकरणामुळे चारफाटा परिसराला सुंदर रूप येणार आहे.

Exit mobile version