श्रीराम पूल रस्त्यावर डांबरीकरण
| नेरळ | प्रतिनिधी |
कर्जत शहराचे प्रवेशद्वार असणारा चारफाटा येथून पुढे जाणारा रस्ता हर खड्डेमय झाला होता. त्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांसह स्थानिक संतप्त झाले होते. दरम्यान, सोमवारी (दि.3) श्रीराम पूल ते कर्जत चारफाटा भागातील रस्त्यावरील खड्डे डांबर टाकून भरले जात आहेत. कर्जतमध्ये प्रवेश करणारा रस्ता खड्डेमुक्त झाल्याने स्थानिकांसह वाहनचालकांनी समाधान व्यक्त केले आहे.
कर्जत चारफाटा मुख्य सर्कलवर चौक, मुरबाड, कर्जत, रेल्वे स्टेशनकडे जाणऱ्या रस्त्यांवर नेहमीच वाहनांची मोठ्या संख्येने वर्दळ असते. त्यात कर्जत चारफाटा येथील महत्त्वाच्या सर्कलवर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्यामुळे वाहनांना तसेच स्थानिक नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागत होता. त्या ठिकाणी पडलेल्या खड्ड्यांमुळे छोटे मोठे अपघात देखील होत होते. तसेच, खराब रस्त्यामुळे स्थानिकांनाही त्रास सहन करावा लागत होता. त्यातच शनिवार, रविवार किंवा सुट्टीच्या दिवशी कर्जत तालुक्यातील फार्म हाऊसेस आणि माथेरान या ठिकाणी जाण्यासाठी चारफाटा रस्त्याच्या अवलंब करत मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. परंतु, येथे माठ्या प्रमाणात खड्डे असल्याने या ठिकाणी ट्रॅफिकची देखल समस्या निर्माण होत होती.
दरम्यान, या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे दररोज वाहनचालकांकडून आणि नागरिकांकडून ओरड आणि टीका होत होती. त्यावर लोक प्रतिनिधींनी आवाज उठवताच कर्जत चार फाटा ते श्रीराम पूल या दरम्यानच्या रस्ता डांबर टाकूण खड्डेमुक्त करण्यात आला. या रस्त्यावरील सर्वाधिक खड्डे हे गणेश मंदिर ते राजमुद्रा चौक या भागात होते. त्या ठिकाणचे खड्डे खडीकरण आणि डांबरीकरण अशा पद्धतीने भरले गेले. तसेच, राज्य रस्ते विकास महामंडळाकडून चारफाटा येथे तीन लेन खड्डेमुक्त करण्याचे काम सुरु करण्यात आले. या सर्व कामांमुळे कर्जत शहरात येणाऱ्या वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांडून समाधान व्यक्त केले जात आहे.