| उरण | वार्ताहर |
उरण तालुका व शहरातील सेफ्टी झोन व सीआरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे सुरू आहेत. त्याबाबत नागरिकांकडून संबंधित प्रशासनाकडे तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली जात नसल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात येत आहे.
उरण तालुक्यात झपाट्याने नागरिकीकरण वाढत चालले आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात त्यांच्या निवाऱ्याचा प्रश्न उद्भत आहे. त्याचाच फायदा घेत येथील भुमाफीया व बिल्डर यांच्याकडून सेफ्टी झोन व सीआरझेड क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकामे केली जात आहेत. मोठमोठ्या इमारती उभारल्या जात आहेत. विशेषतः कुंभारवाडा, मोरा, करंजा, केगाव, नागाव, आवरे भागात विनापरवाना मोठ्या इमारती उभ्या राहत आहेत. तसेच, बोरी नाका परिसरात भंगार माफियांनी कोणतीही परवानगी न घेता आरसीसी बांधकामे उभारली आहेत. तरी देखील या अनधिकृत बांधकामांवर कोणतीही ठोस कारवाई होत नसल्याने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. तसेच, समुद्रकिनारी सीआरझेड कायद्याचे उल्लंघन करून उभारल्या जाणाऱ्या मोठ्या इमारतींबाबत उरण तालुका मराठी पत्रकार संघाने चिंता व्यक्त केली आहे. तसेच, या अनधिकृत बांधकामांमध्ये स्थानिक ग्रामपंचायत आणि शासकीय अधिकाऱ्यांच्या सहभागाची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
दरम्यान, डोंबिवली परिसरातील अनधिकृत इमारतींवर न्यायालयाने कारवाईचे आदेश दिले आहेत, ज्यामुळे अनेक रहिवासी बेघर होण्याच्या संकटात सापडले आहेत. भविष्यात उरणमध्येही अशा प्रकारची कारवाई होण्याची शक्यता असल्यामुळे नागरिकांनी सावध राहावे. ग्राहकांनी कोणत्याही सदनिकेच्या खरेदीपूर्वी सर्व कागदपत्रांची खातरजमा करावी, अन्यथा भविष्यात मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागू शकतो. असे आवाहन करण्यात येत आहे.
कोणतीही ठोस कारवाई नाही
पत्रकार व सामाजिक संघटनांनी वारंवार तक्रारी करूनही नगरपालिका आणि ग्रामपंचायत प्रशासनाकडून कोणतीच ठोस कारवाई झालेली नाही. त्यांच्याकडून नोटिसा बजावल्याचा दावा केला जात असला तरी, प्रत्यक्षात कोणतीही ठोस कृती झालेली नाही. अद्याप एकही अधिकाऱ्यांनी अनधिकृत इमारत पाडण्याचे धाडस दाखवलेले नाही. परिणामी, मोठमोठ्या अनधिकृत इमारती युद्धपातळीवर उभारल्या जात आहेत. त्यात संबंधित अधिकारी, अनधिकृत बांधकाम करणारे बिल्डर आणि इतर आर्थिक हितसंबंध असलेल्या व्यक्तींच्या संगनमताची शक्यता वर्तविली जात आहे.
अधिकाऱ्यांवर शिस्तभंगच्या कारवाईची मागणी
उरण तालुका व शहरातील अनधिकृत बांधकामे त्वरित थांबवून दोषींवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून केली जात आहे. तसेच, या बांधकामांना परवानगी देण्यात आली आहे का, याची स्पष्ट माहिती नागरिकांना द्यावी. जर अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले असेल, तर त्यांच्यावर शिस्तभंग कारवाई करावी, अशीही नागरिकांची मागणी आहे.