57.09कोटींच्या नळपाणी योजनेला मान्यता
। नेरळ । प्रतिनिधी ।
कर्जत नगरपरिषदेच्या प्रयत्नाला यश आले असून कर्जत शहरातील नागरिकांना 24 तास पाणी पुरवठा करण्याचे स्वप्न साकार होणार आहे. दरम्यान, केंद्राच्या अमृत 2.0 मधून ही नळपाणी योजना राबविली जाणार असून 57.09 कोटींची योजनेला मंजुरी मिळाली आहे.
सध्या अस्तित्वात असलेल्या कर्जत वाढीव नळपाणी योजना 1998 मध्ये सुरू झाली होती. यानंतर या योजनेची वयोमर्यादा संपली असून नवीन नळपाणी योजनेसाठी कर्जत नगरपरिषद मागील काही वर्षे सतत प्रयत्न करीत होते. केंद्र सरकारच्या अमृत 2.0चे निकष पूर्ण व्हावेत यासाठी प्रयत्न सुरू झाले आणि ते निकष पूर्ण होत आल्यानंतर पालिकेने 31 ऑगस्ट 2023 रोजी ठराव मंजूर केला. महारष्ट्र जीवन प्राधिकरण कडून सप्टेंबर 2023 मध्ये मान्यता मिळाल्यानंतर शासनाने कर्जत नळपाणी पुरवठा योजनेच्या अंदाजपत्रकास 23 जानेवारी 2024 रोजी मान्यता दिली. यानंतर केंद्र सरकारच्या अमृत 2.0 मधून या योजनेचे काम व्हावे यासाठी राज्य सरकारकडून प्रयत्न सुरू झाले.
पाटबंधारेकडून पाण्याचे आरक्षण
योजना मंजूर झाली असली तरी पाटबंधारे विभागाकडून पाण्याचे आरक्षण याची कार्यवाही पालिका मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी जानेवारी महिन्यात सुरू केली. यात पाटबंधारे कर्जत उप विभागीय अधिकारी, कोलाड येथील कार्यकारी अभियंता, ठाणे येथील अधीक्षक अभियंता आणि कोकण भवन येथील मुख्य अभियंता या कार्यालयांकडे पाठपुरावा करून पाण्याचे आरक्षण निश्चित केले असून 23 ऑगस्ट 2024 रोजी सचिव स्तरावर आदेश पारित झाले आहे.