वाहन चालक हैराण
| नेरळ | वार्ताहर|
कर्जत-मुरबाड राष्ट्रीय महामार्गावर कळंब पोलीस चौकीच्या दरम्यान मोठमोठे खड्डे पडले आहेत. सतत कोसळणाऱ्या धो धो पावसाचे पाणी साचल्याने रस्त्याला डबक्यांचे स्वरूप आले असून, वाहनचालकांना तारेवरची कसरत करून प्रवास करावा लागत आहे. संबंधित प्रशासनाकडे तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी स्थानिक नागरिकांकडून केली जात आहे. कर्जत-मुरबाड राष्ट्रीय मार्गाचे मागील चार-पाच वर्षांपूर्वी सिमेंट काँक्रिटचे काम करण्यात आले आहे. मात्र, काही ठिकाणी काम अपूर्णावस्थेत असल्याने त्याठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. कळंब येथील विमान प्राधिकरणच्या जवळ वळणावर मोठ मोठे खड्डे पडले असून, खड्ड्यात पाणी साचल्याने दुचाकीधारकांना खड्ड्याचा अंदाज येत असल्याने अपघातही होत आहे. या महामार्गावर मोठ्या संख्येने अवजड वाहनांची रहदारी असल्याने वाहतुकीसाठी धोकादायक ठरत आहे. दरम्यान, कळंब ग्रामस्थांनी संबंधित विभागाने तातडीने खड्डे भरुन आमचा मार्ग प्रवासायोग्य करावा, अशी मागणी केली आहे. अन्यथा आम्हाला रस्ता रोको करावा लागेल, असा इशारा दिला आहे.