पांगळोळी सरपंच, ग्रामसेवकाकडून अपहार

कारवाईकडे मात्र प्रशानसाचे दुर्लक्ष

| म्हसळा | वार्ताहर |

पांगळोली ग्रामपंचायतीमधील कथित गैरव्यवहार प्रकरणी कोकण आयुक्तांनी सरपंच बिलाल कौचाली आणि ग्रामसेवक गणपती केसरकर यांना दोषी ठरवित त्यांच्यावर साठ लाखांचा अपहार केल्याचा ठपका ठेवला आहे. मात्र त्यांच्यावर कारवाई करण्याकडे म्हसळा गटविकास अधिकारी कानाडोळा करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. याबाबत येथील ग्रामस्थांनी अनेकवेळा गटविकास अधिकारी म्हसळा यांच्याकडे तक्रार दाखल करून देखील योग्य ती कार्यवाही केली नाही.त्यामुळे ग्रामस्थांच्यावतीने आता कोकण विभागीय आयुक्तांकडे तक्रार करुन या ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी केली जावी, अशी मागणी करण्यात आली आहे. भ्रष्टाचार झाल्यासंदर्भात ग्रामस्थांनी अखेर कोंकण आयुक्त कोकण भवन यांच्याकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणी सर्व चौकशी झाल्यानंतर कारवाई करीत कोकण भवन आयुक्त यांनी सरपंच बिलाल कौचाली आणि ग्रामसेवक .गणपती केसकर यांना सदर प्रकरणी दोषी ठरवत 60 लाख1 हजार 16 रुपयांचे अपहार झाले असल्याचा निर्णय देण्यात आला.

14 जून 2023 रोजी देण्यात आलेल्या या निर्णयाप्रमाणे सरपंच बिलाल कौचाली आणि ग्रामसेवक गणपती केसकर यांच्याकडून सदरचा गुन्हा झाला असल्याने याबाबत सरपंच आणि ग्रामसेवक यांच्याकडून सदरची रक्कम रुपये 60 लाख 1 हजार 16 रुपये. रक्कम वसूल करण्यात यावी. तसेच भ्रष्ट सरपंच आणि ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा.असेही नमूद करण्यात आले होते, मात्र गटविकास अधीकारी म्हसळा यांनी आजतागायत सदरच्या दोषींविरोधात गुन्हा दाखल केला नसल्याने पांगळोली ग्रामस्थानी संताप व्यक्त केला.

24 जुलै 2023 रोजी पांगळोली ग्रामपंचायत येथे प्रशासकांच्या माध्यमातून विशेष ग्रामसभा आयोजित करण्यात आली होती. कार्यालयामध्ये ग्रामसेवक गणपती केसकर हे ग्रामसेवक म्हणून कार्यरत असलेले पाहून पांगळोलीचे सामाजिक कार्यकर्ते अझहर धनसे यांनी याबाबत ह्या ग्रामसेवकांवर भ्रष्टाचाराचा दोष सिद्ध झाला आहे असा ग्रामसेवक आमच्या ग्रामपंचायत कार्यालयात अजूनपर्यंत कसाकाय कार्यरत आहे,असा सवाल उपस्थित केला.त्यावरुन बराच वाद झाला. सभा तहकूब करण्यात यावी असा ठराव संमत केला. मात्र या प्रकरणी ग्रामसेवक केसकर यांनी भ्रष्टाचाराचे प्रकरण उघडकीस आणल्याचा राग मनात ठेऊन श्री. अझहर धनसे आणि त्यांचा भाऊ मुजाहिद धनसे यांच्यावर म्हसळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. यासंदर्भात म्हसळा पोलिसांनी अझहर आणि मुजाहिद धनसे यांना अटक केली आहे.

Exit mobile version