विद्यार्थी, शिक्षकांना मार्गदर्शन
| कर्जत | प्रतिनिधी |
कर्जत पोलीस ठाणे हद्दीतील शालेय विद्यार्थी सुरक्षा अनुषंगाने कर्जत येथील डोणे शाळा व शारदा मंदिर शाळांना भेट देऊन तेथील शिक्षक, विद्यार्थ्यांशी संवाद साधला व त्यांना मार्गदर्शन केले.
कर्जत पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस नाईक सोनाली घोलप, महिला पोलीस शिपाई सुजाता पाटील, महिला पोलीस शिपाई स्वाती चिरमे, महिला पोलीस शिपाई पूनम डोमे उपस्थित होते.
शाळेत येणारे विद्यार्थी हे खाजगी वाहनाने प्रवास करणार नाहीत याची दक्षता घ्यावी, मुलींचे सुरक्षे करिता शासनाचे परिपत्रका नुसार उपाययोजना कराव्यात, मुलींकडे महिला शिक्षक यांनी नियमितपणे त्यांना कोणी त्रास देतोय का, कोण तुमचा पाठलाग करतोय का याची विचारणा करावी, शाळेच्या आवारात सुरक्षेकरिता सीसीटिव्ही कॅमेरे बसवावेत, मुलांचे स्वच्छतागृह नियमित चेक करावेत व ते स्वच्छ राहतील याची काळजी घेऊन ते सुरक्षीत आहेत याची दक्षता घ्यावी, मुलांना घेऊन येणारे वाहन चालक यांची संपूर्ण माहिती घेणे व त्यांना मुलांचे सुरक्षा विषयक सूचना वेळोवेळी कराव्यात तसेच पाचवी ते सातवीचे विद्यार्थी यांच्यासोबत मैत्रीपूर्ण प्रश्नोतरी स्वरूपात गप्पा मारून गुड टच बॅड टच, अनोळखी व्यक्तीकडून चॉकलेट घेऊ नये, त्यांच्यासोबत कोठेही जाऊ येऊ नये, नेहमी आईवडील, दादा, ताई यांच्यासोबतच शाळेत यावे व जावे, अशा सूचना यावेळी दिल्या.
