| नेरळ | प्रतिनिधी |
महाराष्ट्र भूषण आदरणीय तीर्थरूप डॉ नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त कर्जत तालुक्यात स्वच्छता अभियान राबविण्यात आले. तालुक्यात असलेल्या मोठ्या गावात तालुक्यातील सर्व श्री सदस्य रस्त्यावर उतरले होते. तालुक्यातील किमान 4000 श्री सदस्य रस्त्यावर आल्यानंतर आज कर्जत तालुका चकाचक दिसून आला.
डॉ. नानासाहेब धर्माधिकारी यांच्या जयंतीनिमित्त देशभरात स्वच्छता अभियान पद्मश्री डॉ अप्पासाहेब धर्माधिकारी तसेच रायगड भूषण डॉ श्री सचिन धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली होत आहे.स्वच्छता हा समाजसेवेचा महत्त्वाचा भाग मानून गेल्या अनेक वर्षांपासून प्रतिष्ठानच्या माध्यमातून विविध उपक्रम राबवले जात आहेत. विशेषतः ङ्गगाव स्वच्छता अभियानफ हा उपक्रम गेल्या सात वर्षांपासून मोठ्या प्रमाणावर राबवला जात आहे. कर्जत तालुक्यात एकूण 34 बैठकींमधून हजारो श्रीसदस्य या अभियानात सहभागी झाले होते. श्री बैठक गुढवण, श्री बैठक पाथरज, श्री बैठक वारे, श्री बैठक चाफेवाडी, श्री बैठक कोळीवली या सर्व बैठकी मधून या स्वच्छता अभियानासाठी श्री सदस्य लाभले होते. स्वच्छता मोहिमेत कशेळे येथील ग्रामीण रुग्णालय कशेळे, जिल्हा परिषद शाळा, स्मशानभूमी, हनुमान मंदिर आणि छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसर, कशेळे मार्केट आणि आजूबाजूचा परिसर स्वच्छ करण्यात आले. ग्रामीण रुग्णालय कशेळे येथील कर्मचारी वर्गाकडून या स्वच्छता अभियान उपक्रमाचे कौतुक करण्यात आले.






