। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुका शेतकरी कामगार पक्षाचे तालुका चिटणीस म्हणून प्रभारी चिटणीस श्रीराम राणे यांची निवड करण्यात आली आहे. पक्षाचे दिवंगत तालुकाध्यक्ष प्रवीण पाटील यांच्या निधनानंतर पक्षाला तालुका अध्यक्ष मिळाला नव्हता. दरम्यान, पक्षाच्या वर्धापन दिन सोहळ्यात श्रीराम राणे यांच्याकडे तालुका चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली.
कर्जत तालुका पूर्वी शेतकरी कामगार पक्षाचा बालेकिल्ला समजला जायचा. भाऊसाहेब राऊत यांचे मोठे योगदान कर्जत तालुक्यात शेतकरी कामगार पक्षाची बीजे निर्माण करण्यात होते. त्यामुळे 1990 पर्यंत कर्जत तालुका शेकापचा बालेकिल्ला समजला जायचा. त्यानंतर प्रवीण पाटील यांनी पुनः अनेकदा शेतकरी कामगार पक्षाला कर्जत तालुक्यात वैभव प्राप्त करून देण्याचा प्रयत्न सुरु केला होता. मधल्या काळात शेकापच्या दोन उमेदवारांना विधानसभा निवडणुकीत अगदी थोडक्या मतांनी पराभव पत्करावा लागला होता. त्यानंतर पाटील यांच्या तालुका चिटणीसपदाच्या काळात शेतकरी कामगार पक्षाने उभारी घेण्यास सुरुवात केली होती. मात्र, जुलै 2020 मध्ये प्रवीण पाटील यांचे कोरोना काळात निधन झाल्याने शेकापचे तालुका चिटणीसपद रिक्त होते. सहा महिन्यांपूर्वी कळंब जवळील वारे ग्रामपंचायतीमधील पक्षाचे निष्ठावंत कार्यकर्ते श्रीराम राणे यांच्यावर प्रभारी तालुका चिटणीसपदाची जबाबदारी देण्यात आली होती. ती जबाबदारी राणे यांनी व्यवस्थित पार पडल्याने आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहामुळे श्रीराम राणे यांची नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
श्रीराम राणे हे स्वतंत्रसैनिक यांचे नातू असून, त्यांनी वारे ग्रामपंचायतीमध्ये शेतकरी कामगार पक्षाची सत्ता टिकविण्यात यश मिळविले आले आहे. सध्या या ग्रामपंचायतीवर श्रीराम राणे यांचे पुत्र थेट सरपंच म्हणून कार्यरत आहेत. राणे हे स्वतः नेरळ येथे राहून पक्षाचे राजकारण गेली अनेक वर्षे करीत आहेत. त्यात मागील तीन वर्षे श्रीराम राणे यांनी रायगड जिल्हा शेतकरी कामगार पक्षाचे खजिनदार पदावर काम केले आहे. त्यामुळे तालुका चिटणीसपदाची महत्त्वाची जबाबदारी श्रीराम राणे यांच्यावर टाकण्यात आली आहे. आगामी काळात रायगड जिल्हा परिषद, कर्जत पंचायत समिती तसेच माथेरान नगरपरिषद निवडणूक होणार आहे. तसेच या वर्षअखेरीस तालुक्यातील काही ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. त्यामुळे राणेंवर मोठी जबाबदारी पक्षाची ताकद दाखवण्याची महत्त्वाची ठरणार आहे.