कर्जत तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलले

सख्खा भावानेच केली हत्या, सलग 36 तास पोलिसांनी केली चौकशी; पांढर्‍या शर्टवरुन आरोपीला केले गजाआड

| खास प्रतिनिधी | रायगड |

कर्जत येथील तिहेरी हत्याकांडाचे गूढ उकलण्यात रायगड पोलिसांना यश आले आहे. सख्खा भाऊ, त्याची पत्नी आणि मुलाला ठार मारणारा हनुमंत पाटील याला पोलिसांनी तपासादरम्यान अटक केली होती. त्यानेच हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

आरोपीची सलग 36 तास चौकशी करण्यात आली. त्यामध्ये आरोपीने हत्या करताना वापरलेला शर्ट आणि नंतर त्याने परिधान केलेला टी-शर्ट याच्यामध्ये विसंगती आढळल्याने पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळल्या असल्याची माहिती पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पत्रकार परिषदेत दिली. मालमत्तेच्या वादातून हनमुंत पाटील याने अतिशय थंड डोक्याने तिघांची हत्या केल्याचे कबूल केले आहे. आरोपीचे कृत्य पूर्वनियोजित तसेच अत्यंत क्रूरपणे त्याने तिघांची हत्या केल्याने सदरचा खटला फास्ट ट्रॅकवर चालवण्यात येणार आहे. त्यामाध्यमातून आरोपीला फाशी मिळावी, अशी मागणी न्यायालयाकडे करणार असल्याचेही घार्गे यांनी स्पष्ट केले.
8 सप्टेंबर 2024 रोजी कर्जत तालुक्यातील नेरळ पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये चिकनपाडा गावातील नदीमध्ये आठ वर्षांच्या मुलाचा मृतदेह आढळला होता. गावात मुलाचा मृतदेह नेला असता मुलाचे आई-वडील घरात नसल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी शोध घेतला असता त्याच नदीच्या पात्रामध्ये मुलाच्या आईचा तसेच काही अंतरावर वडिलांचा मृतदेह सापडला. मदन पाटील, माधुरी पाटील आणि त्याचा मुलगा याच्या मृतदेह शवविच्छेदनासाठी जे.जे. रुग्णालयात पाठवण्यात आले होते.

पोलिसांनी केली सलग 36 तास चौकशी
पोलिसांनी संशयित म्हणून मृत मदन पाटील याच्या शेजारी राहणारा त्याचा सख्खा भाऊ हनुमंत पाटील याला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान तो पोलिसांच्या प्रश्‍नांना उडवाउडवीची उत्तरे देत होता. सलग 36 तास विविध पोलीस अधिकारी त्याची चौकशी करत होते. मात्र, त्यांच्याकडून कोणतेच धागेदोरे हाती सापडत नव्हते.
पोलीस मदनला सोडून देणार होते
प्रश्‍नांची सरबत्ती करुनदेखील हनुमंत डगमग नव्हता. आता त्याच्याकडून अधिक काही माहिती मिळणार नसल्याचे लक्षात येताच पोलीस अधिकारी त्याला सोडून देणार होते. त्यावेळी आरोपीने परिधान केलेला शर्ट आणि सीसीटीव्हीच्या फुटेजवरुन पोलिसांना एक धागा सापडला. आरोपी हा हत्याकांडाच्या दिवशी पोशीर गावात आपल्या चुलत मामाकडे गणपती दर्शनासाठी गेला. त्याआधी त्याने स्वतःच्या पत्नी आणि मुलांना पत्नीच्या माहेरी पाठवून दिले. त्या रात्री तो मामाकडेच जेवला आणि माळ्यावर झोपायला गेला.
त्या पांढर्‍या शर्टवरुन आरोपीच्या मुसक्या आवळल्या
झोपायला जाताना त्याने मामाला तसेच सांगितले होते. त्यामुळे पोलीस चौकशीत मामाने तशी माहिती पोलिसांना दिली होती. चिकनपाडा येथे जाऊन हनुमंतने तिघांची हत्या केली आणि पहाटे मामाकडे पोशीर गावात आला. तेथे पहाटेच गणपतीसमोर खुर्चीत बसला. जेणे करुन सर्वांना वाटावे की तो अन्य कोठे गेला नाही. मात्र, पोशीर येथील एका शाळेमध्ये सीसीटीव्ही आहे. त्यामध्ये तो कैद झाला होता. हत्या करण्यासाठी जाताना त्याने पांढरा शर्ट परिधान केला होता. हत्या करुन परतताना त्याने अंगात टी-शर्ट परिधान केला असल्याचे समोर आले. त्यानंतर पोलीस खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
तिघांना अत्यंत क्रूरपणे संपवले
भावाच्या घरात गणपती असल्याने दरवाजा उघडा होता. याचा फायदा घेऊन त्याने रात्री भावासह त्याची पत्नी आणि मुलाच्या डोक्यात वार करुन त्यांना ठार मारले. त्यानंतर घटनास्थळावरील पुरावे नष्ट केले. तिन्ही मृतदेहांना त्याने ठराविक अंतरावर नदीत फेकून दिले. राहत्या घरातमध्ये हिस्सा आणि रेशनकार्डवरील धान्य मिळत नसल्याने सख्ख्या भावाचे कुटुंब संपवल्याची कबुली त्याने दिली. त्याने तिघांचा नाही, तर चौघाचा खून केला आहे. कारण, मृत माधुरी ही सात महिन्यांची गरोदर होती.

कर्जत पोलीस विभागीय अधिकारी धुळा टेळे, स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे, नेरळचे प्रभारी सहायक पोलीस निरीक्षक शिवाजी ढवळे यांच्यासह त्यांच्या पथकाने अथक परिश्रम घेत गुन्ह्याचा तपास करुन आरोपीला अटक केली.
Exit mobile version