शासनाच्या ट्रँकरला मंजुरी नाही
‘जीवनज्योत’चा पाणीटंचाई निवारण्याचा प्रयत्न
। नेरळ । वार्ताहर ।
कर्जत तालुक्याच्या आदिवासी भागाला पाणीटंचाईच्या झळा बसू लागल्या आहेत. आदिवासी भागात महिलांना काही किलोमीटर अंतर जाऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी डोक्यावरून पाण्याचे हांडे आणावे लागत आहेत. दरम्यान, कर्जत पंचायत समितीकडून सरकारी नियम पुढे केले जात आहेत आणि त्यामुळे आदिवासी लोकांच्या पाण्याची तहान भागविण्यासाठी जीवनज्योत सामाजिक संस्था सरसावली असून, पाण्याचे टँकर सुरू केले आहेत. पाच आदिवासी वाड्या आणि एक आश्रम येथे या संस्थेकडून टँकरने पाणी पोहोचवले जात आहे.
कर्जत या भौगोलिकदृष्ट्या दुर्गम भागात वसलेल्या तालुक्यातील अर्ध्या भागात उन्हाळा सुरू झाला की पाणीटंचाईची स्थिती निर्माण होते. तालुक्यातील 58 आदिवासी वाड्या आणि 23 गावांमध्ये शासनाच्या पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार पाणीटंचाई आहे.ती पाणीटंचाई दूर करण्यासाठी शासनाकडे तो आराखडा जानेवारी महिन्यात पाठविण्यात आला आहे. मार्चअखेरपासून कर्जत तालुक्याच्या दुर्गम भागात पाणीटंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे पाणीटंचाईवर मात करण्यासाठी अनेक आदिवासीवाड्यांमधील आदिवासी ग्रामस्थ हे आपल्या भागात पाणीटंचाई निर्माण झाली असून, महिलांना काही किलोमीटर दूर जाऊन पाणी आणावे लागत असल्याचे कर्जत पंचायत समितीत जाऊन सांगितले.कर्जत पंचायत समितीमध्ये लोकनियुक्त पदाधिकारी असताना तालुक्याच्या ग्रामीण भागातून आलेल्या लोकांचे म्हणणे ऐकून घेण्यासाठी सभापती-उपसभापती असायचे आणि तात्काळ पाणीटंचाईग्रस्त भागाला टँकरने पाणीपुरवठा सुरू व्हायचा. मात्र, सध्या पंचायत समितीवर प्रशासक असल्याने तालुक्याच्या आदिवासी आणि ग्रामीण भागातून आलेल्या ग्रामस्थांची दाद फिर्याद घ्यायला कोणी नाही. त्यामुळे पाणीटंचाईच्या स्थितीबद्दल सांगायला गेल्यावर पंचायत समितीचे प्रमुख अधिकारी कोणाचेही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नसतात.त्याचवेळी प्रशासन आपली कैफियत ऐकून घेत नसल्याने कर्जत तालुक्यातील ग्रामीण भागातील जनतेचे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सुरू आहेत.
तालुक्यातील शिलार, ताडवाडी, मोरेवाडी, सुतारवाडी, बनाचीवाडीमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी या आदिवासी लोकांनी कर्जत पंचायत समितीकडे टँकरची मागणी केली. मात्र, कर्जत पंचायत समितीने कागदपत्रांची ढाल पुढे करीत पाणीटंचाई नाही, असे ठरवून टँकरने पाणीपुरवठा करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे सरकारी टँकरचे पाणी मिळत नाही ही भावना नेहमीप्रमाणे आतादेखील कायम असून, शासनाच्या टँकरची वाट न पाहता तालुक्यातील अनेक आदिवासी वाड्यांमधील महिला पिण्याचे पाणी आणण्यासाठी पायपीट करीत आहेत.
अन् पोहोचले टँकर
शेवटी कळंब ग्रामपंचायतीमधील सुतारपाडा, सुतारवाडी तसेच पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी, मोरेवाडी, शिलार येथील आदिवासी लोकांनी सामाजिक संघटनांकडे पाण्याच्या टंचाईची कैफियत मांडली. शेवटी गेली अनेक वर्षे आदिवासी भागात सरकारी ट्रँकर नसेल पोहचत तर आपली यंत्रणा वापरून ट्रँकर पोहचवणारे जीवनज्योत सामाजिक संस्था यांच्याकडे धाव घेतली. या संघटनेचे अध्यक्ष कांबळे आणि सचिव राजेश गायकवाड यांनी निर्णय घेऊन पिण्याचे पाणी टँकरच्या माध्यमातून पोहचवले आहे. पाण्याची टंचाई उद्भवलेल्या पाथरज ग्रामपंचायतीमधील ताडवाडी, मोरेवाडी, शिलार आणि शिलार येथील प्रेम कुटीर वृद्धाश्रम येथे आता दर दोन दिवसांनी जीवनज्योत सामाजिक संस्थेकडून पाण्याचा टँकर पोहोचणार आहे. त्याचवेळी तालुक्यातील बनाची वाडी आणि कळंब सुतारपाडा येथे देखील पाण्याचे टँकर पोहोचले आहेत.
आमच्याकडे कोणत्याही पाणीटंचाईग्रस्त वाडी आणि गावातून प्रस्ताव आलेले नाहीत. मात्र, खासगी स्वयंसेवी संस्था पाणी वितरण करीत असल्याची माहिती मिळाल्याने तात्काळ पाणीपुरवठा विभागाला त्या सर्व वाड्यांमध्ये जाण्याची सूचना करण्यात आली आहे. तेथील अहवाल आल्यानंतर आम्ही ग्रामसेवक यांच्याकडून प्रस्ताव बनवून घेऊ आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पाठवून देऊ. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परवानगी आल्यानंतर आम्ही टँकर सुरू करण्याची कार्यवाही करू. – चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती
– चंद्रकांत साबळे, गटविकास अधिकारी, कर्जत पंचायत समिती
आम्ही अनेक वर्षे पाणीटंचाई भागात पाणी पुरविण्याचे काम करीत आहोत. ग्रामस्थांच्या मागणीनुसार 26 मार्चपासून टँकर सुरू केले असून, पाणीटंचाई दूर करण्याचा आमचा प्रयत्न आहे.
– राजेश गायकवाड, सचिव, जीवनज्योत सामाजिक संस्था







