कर्जतचा मिडलाईन संघ विजेता

। नेरळ । प्रतिनिधी ।
पनवेल येथील तळोजा येथे राज्ययस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन केले होते.राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतच्या अंतिम सामन्यात रत्नागिरी संघावर चित्त थरारक विजय मिळवीत कर्जतच्या मिडलाईन संघ स्पर्धेत चॅम्पियन ठरला.
तीन दिवस तळोजा येथे राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धा रंगली होती. मॅट वरील या स्पर्धेत कर्जत मिडलाईन कबड्डी संघाने अंतिम लढतीत चुरशीच्या सामन्यात रत्नागिरी संघावर 35/33 असा दोन गुणांनी रोमहर्षक विजय मिळवून रायगड जिल्ह्याचे नाव महाराष्ट्र राज्यात उज्वल केले. या राज्यस्तरीय स्पर्धेत राज्यातील अनेक नामवंत कबड्डी संघ सहभागी झाले होते. तसेच प्रो कबड्डी नावाजलेले खेळाडू या स्पर्धेत खेळत होते. अशा सर्व मातब्बर संघावर मात करीत कर्जत मिडलाईन संघाने अंतिम फेरीत प्रवेश केला. अंतिम सामन्यात तगडा प्रतिस्पर्धी रत्नागिरी संघात प्रो कबड्डी स्पर्धेत खेळणारे उत्तम खेळाडू असून सुद्धा रविवारी रात्री उशिरा झालेल्या अंतिम चुरशीच्या सामन्यात कर्जत मिडलाईन संघाने विजय मिळवला. शेवटच्या चढाई पर्यंत चाललेल्या या सामन्यात दोन्ही संघाकडे समान 33/33 गुण होते आणि शेवटच्या रत्नागिरीच्या चढाईत मिड लाईन संघाचे फक्त तीन खेळाडू मैदानात असताना सुपर टॅकल पक्कड करून दोन गुण मिळवत सामना आपल्या बाजूने झुकवून रोमहर्षक विजय मिळवला.
स्पर्धेतील उत्कृष्ट पक्कडचा मानकरी मिडलाईन कडून खेळणारा मुद्रे गावातील प्रतीक बैलमारे ठरला. तर स्पर्धेतील सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मानकरी देऊळवाडी गावाचा सनी गायकर याला मिळाला असून त्याला मोटरसायकल देऊन गौरविण्यात आले. नांगुर्ले गावाचा राजेंद्र देशमुख, हलवली गावाचा प्रशांत जाधव, चेडोबा मुद्रे गावाचा वैभव मोरे व इतर खेळाडू यांनी मिडलाईन संघ तयार केला आहे. प्रशिक्षक अनिकेत म्हात्रे यांनी कर्जत मधील विविध खेळाडू एकत्र करून हा संघ बांधला आहे

Exit mobile version