| अलिबाग | प्रतिनिधी |
उसने घेतलेले पैसे परत दिले नाही. याचा राग धरून आरोपीने कार्ले येथील एका इसमाला बेदम मारहाण केली. त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी अलिबाग पोलीस ठाण्यात मारेकऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना अटक केली आहे.
गिरीष कृष्णा पाटील (44) असे या मृत व्यक्तीचे नाव आहे. हा इसम कार्ले येथील रहिवासी आहे. त्यांनी पोयनाड येथील राजश्री जयस्वाल यांच्याकडून वीस हजार रुपये उसने पैसे घेतले होते. ही रक्कम परत दिली नसल्याचा राग धरून जयस्वाल यांच्यासह चौघेजण 29 जून रोजी सायंकाळी पाटील यांच्या घरात घुसले. त्यावेळी झालेल्या वादात आरोपींनी गिरीश पाटील यांना बेदम मारहाण केली. त्यानंतर गावातील पाटील आळीत जाणाऱ्या रस्त्यावर पुलाच्या बाजूला सदानंद पाटील यांच्या घरासमोर आणून पाटील यांच्या डोक्यावर विटेने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केले.
यामध्ये गिरीश पाटील यांना गंभीर दुखापत झाल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आरोपी जयश्री जयस्वाल, योगेश मोहटे, योगेश सहाणी यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला असून त्यांना अटक केली आहे. या गुन्ह्यात एका अल्पवयीन मुलाचादेखील सहभाग असल्याची माहिती समोर येत आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक किशोर साळे करीत आहेत.