बंगळुरू | वृत्तसंस्था |
कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस. येडियुरप्पा यांचा दोन वर्षांचा कार्यकाळ सोमवारी पूर्ण होताच त्यांनी राजीनामा दिला आहे. कर्नाटकमध्ये खांदेपालट होण्याचे संकेत अनेक दिवसांपासून वर्तवण्यात आले होते. अखेर सोमवारी येडियुरप्पा मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाले आहेत.
पक्षश्रेष्ठींचे निर्देश मिळाल्यानंतर आपण योग्य तो निर्णय घेऊ. पक्षश्रेष्ठींचे निर्देश आले की तुम्हालाही त्याबाबत कळेलच, असे येडियुरप्पा यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले होते. आपण केंद्रीय नेतृत्वाचा निर्णय मान्य करू याचा पुनरुच्चार त्यांनी केला होता. आपण समाधानी असून पक्षाची शिस्त मोडणार नाही, असेही ते म्हणाले होते.
येडियुरप्पा यांनी भाजपा सरकारच्या दुसर्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात हा निर्णय जाहीर केला. दुपारी कर्नाटकचे राज्यपाल थावरचंद गहलोत यांच्याकडे त्यांनी राजीनामा सोपविला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या नेतृत्वात केंद्रात पुन्हा भाजपा सत्तेवर यावी ही माझी इच्छा आहे. असे येडियुरप्पा म्हणाले.