। नवी मुंबई । प्रतिनिधी ।
नवी मुंबईतील हिट अँड रन प्रकरणी एका चौदा वर्षीय मुलाचा शनिवारी (दि.29) सकाळी उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्याच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
दोन दिवसांपूर्वी एक 14 वर्षीय युवक कार्तिक नेहमीप्रमाणे सकाळी 6 वाजता घणसोली येथे जॉगिंग करत असताना त्याला एका वाहनाने ठोकले व त्या मुलाचा अपघात झाला. जखमी कार्तिकला रुग्णालयात घेऊन न जाता वाहन चालकाने तेथून पळ काढला. सुमारे 10-15 मिनिटे तो तेथेच पडून होता. आजूबाजूला गर्दी पाहून अनिकेत नावाच्या एका मुलाने तात्काळ त्याला रिक्षात टाकून वाशी येथील सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. मुलाबद्दल कोणत्याही प्रकारची माहिती नसल्याने नातेवाईकांशी संपर्क साधण्याकरिता त्याने एक व्हिडीओ बनवून व्हायरल केला. यावेळी मुलाच्या तोंडावर जबर मार लागला होता. छातीला व हातापायाला सुद्धा गंभीर जखम झाल्या होत्या. त्यामुळे मुलगा बेशुद्ध अवस्थेत होता. वाशी रुग्णालयात उपचार सुरु होता. मुलाला वाचविण्यासाठी त्यांच्या पालकांचे आतोनात प्रयत्न सुरु होते. मुलाला न्यूरोसर्जनची आवश्यकता असल्याने फोर्टिसमध्ये ऍडमिट करणायचा प्रयत्न केला. परंतु, काही कारणाने येथे भरती करण्यात आले नाही. त्यानंतर सायन हॉस्पिटलमध्ये शिफ्ट करण्यात आले. परंतु, शनिवारी (दि.29) सकाळी या 14 वर्षीय मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.