|आगरदांडा | प्रतिनिधी |
मुरुड तालुका शेतकरी कामगार पक्षात आमूलाग्र बद्दल करण्यात आले आहेत. गेली २१ वर्षे मनोज भगत यांनी मुरुड तालुका चिटणीस म्हणून उत्तम कारभार सांभाळला होता.त्यांच्या कारकीर्दीत शेकापला मोठे यश मिळाले होते. परंतु, शेकाप वर्धापनदिनानिमित्त नवीन कायकिारिणी नियुक्त करण्यात आली असून, त्यात तालुका चिटणीस म्हणून अजित कासार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
मनोज भगत यांना पदोन्नती देण्यात आली असून, त्यांची जिल्हा सहचिटणीस म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे तालुका चिटणीस म्हणून अजित कासार हे कारभार पाहणार आहेत. कासार यांची पत्नी राजपुरी जिल्हा परिषद मतदारसंघातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून कार्यरत आहेत. अजित कासार यांचे आजोबा विठोबा नारायण कासार हे स्वर्गीय प्रभाकर पाटील यांच्या नेतृत्वाखाली काम करीत असत. तेव्हापासूनच कासार कुटुंब शेतकरी कामगार पक्षासोबत अगदी निष्ठेने काम करीत आहे. कासार यांना तालुका चिटणीसपदाची नवीन जबाबदारी देण्यात आल्याने कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसून येत आहे.