केडीएमसीकडे पुरेशी अग्निसुरक्षा नाही

व्हर्टेक्स इमारत आगीनंतर त्रुटी उघड

। कल्याण । प्रतिनिधी ।

कल्याण पश्‍चिमेतील व्हर्टेक्स इमारतीतील अलिकडील आगीच्या दुर्घटनेवरून आमदार भोईर यांनी केडीएमसी प्रशासनावर तीव्र टीका केली. आग आटोक्यात आणण्यासाठी आवश्यक उंच शिडीची गाडी बंद असल्याने त्याच्या उपयोगाअभावी ही दुर्घटना मोठी ठरू शकली असती. या विषयीची अधिकार्‍यांनी सहा महिने फाईल रखडवून ठेवली, ही गंभीर दुर्लक्षाची बाब आहे, असे ते म्हणाले. आयुक्त डॉ. इंदुराणी जाखड यांना याची जबाबदारी स्वीकारावी लागेल, असा आग्रह धरत भोईर यांनी सांगितले की, जर प्रशासन आपल्या जबाबदार्‍या पार पाडत नसेल, तर आम्ही त्यांना जबाबदार ठरविण्यासाठी कडक पावले उचलू असा इशाराही आमदार भोईर यांनी दिला आहे.

कल्याणमधील वरटेक्स या गगन चुंबी इमारतीच्या 15 व्या माळ्यावर मंगळवारी आग लागली होती. ही आग आटोक्यात आणायला कल्याण डोंबिवली पालिका प्रशासनाला यश आले. मात्र, ही आग आटोक्यात आणण्यासाठीची यंत्रणा ठाण्यावरून मागवावी लागली. केडीएमसीकडे पुरेशी यंत्रणा नसल्यामुळे कल्याण डोंबिवली महापालिकेवर टीका होत आहे. यामुळे येथील या गगनचुंबी इमारतीत राहणार्‍या नागरिकांच्या सुरक्षितेचा प्रश्‍न उपस्थित होत आहे. कल्याण-डोंबिवली आणि टिटवाळा परिसरात गगनचुंबी इमारतींच्या वाढत्या संख्येसोबत अग्निशमन यंत्रणेच्या कार्यक्षमतेवर गंभीर प्रश्‍न उभे राहिले आहेत. नुकत्याच एका 16 मजल्यांवर लागलेल्या आगीत उच्चतम दाबाने पाणी मारा करणार्‍या वाहनाच्या तांत्रिक बिघाडामुळे ठाणे महापालिका आणि बदलापूर नगरपालिकेच्या अत्याधुनिक अग्निशमन वाहनांची मदत घ्यावी लागली. या घटनेत जीवितहानी झाल्याची माहिती नाही, परंतु वित्तहानी मोठ्या प्रमाणात झाली आहे.

Exit mobile version