गुरचरणाची जागा अबाधित ठेवा

मुद्रे ग्रामस्थांची प्रशासनाकडे मागणी, जमिनीसंदर्भात कर्जत नगरपरिषदेमध्ये ठराव पारीत

| कर्जत | प्रतिनिधी |

मुद्रे (बुद्रुक), ता. कर्जत, जि. रायगड येथील मुद्रेश्‍वर मंदिरासमोरील गुरचरण जमिनीसंदर्भात कर्जत नगरपरिषदेमध्ये काही ठराव पारीत केले आहेत. ही जमीन महसूल विभागाची आहे. याबाबत उपजिल्हाधिकार्‍यांची ग्रामस्थांनी भेट दिली असता त्यांनी याबाबत मुख्याधिकार्‍यांशी संपर्क साधून ही जमीन नगरपरिषद कोणत्याही वापरासाठी कुणालाही देऊ शकत नाही, असे स्पष्ट केले होते. तरी ही काही संघटना ती जागा आम्हाला मिळावी यासाठी नगरपरिषदेचा ठराव पुढे करून करीत आहेत. आत्तापर्यंत आमच्या गावातील शेतकर्‍यांच्या व गुरचरणीच्या जमिनी विविध शासकीय उपक्रमांसाठी वापरल्या आहेत. ही एकच जागा आता शिल्लक आहे. ती आमच्या धार्मिक व सामाजिक उपक्रमांसाठी अबाधित ठेवावी, अशी विनंती ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे.

या निवेदनात दि. 26 जानेवारी रोजी मुद्रे ग्रामस्थांनी या जागेवर क्रीडा क्षेत्रातील (कबड्डी स्पर्धा) कार्यक्रमासाठी सदर जागेची साफसफाई करण्यास घेतली. त्यावेळी काही सामाजिक संघटनानी त्याच बेकायदेशीर ठरावांचा संदर्भ लावून साफसफाईला विरोध केला. वेळोवेळी त्या बेकायदेशीर ठरावाचा वापर करून त्याच त्याच सामाजिक संघटना ग्रामस्थांना विरोध करून मानसिक त्रास देत आहेत. सदरचा झालेला प्रकार हा ग्रामस्थांच्या बाबतीत अन्यायकारक आहे. आम्ही ग्रामस्थ वेळोवेळी कायदा व सुव्यवस्थेचे पालन करीत आहोत. जेव्हा जेव्हा अशी वेळ आली, तेव्हा शासन दरबारी पत्रव्यवहार केला आहे. या जागेचा वापर आम्ही ग्रामस्थ सातत्याने करीत आहोत. त्यावर इतर कोणत्याही ग्रामस्थांचा कोणत्याही प्रकारचा अधिकार नाही.

आत्तापर्यंत कृषी संशोधन केंद्र, अभिनव ज्ञान मंदिर, प्रशाला, गुलमोहर शासकीय विश्राम गृह, बोहरा व लिंगायत वाणी समाज कब्रस्तान, अग्निशामक दल इमारत, बायोगॅस प्रकल्प, रेल्वे प्रकल्प आदी प्रकल्प हे मुद्रे ग्रामस्थांच्या गुरचरण, गावठाण तर काही प्रकल्प मुद्रे ग्रामस्थांच्या मालकी हक्कांच्या जागेमध्ये तयार करण्यात आले आहेत. या सर्व जागेवर प्रकल्प उभारले असता आम्हा ग्रामस्थांकडे मुद्रेश्‍वर मंदिरा समोरील गुरचरण सर्व्हे नं. 16/0 क्षेत्र 1233 चौ.मी. ही एकमेव जागा मुद्रे (बुद्रुक), मुद्रे (खुर्द), नाना मास्तर नगर ग्रामस्थ यांना धार्मिक विधी (दशक्रिया विधी) सामाजिक, क्रीडा, सांस्कृतिक कार्यक्रमासाठी शिल्लक राहिली आहे. इतर सामाजिक संघटनांना इतरत्र जागा उपलब्ध असताना देखील त्याच जागेसाठी हट्ट करीत आहेत. त्यातून सामाजिक तेढ निर्माण होऊ शकते. सर्व बाजूने आमचेच गावाचे गावठाण व गुरचरण हे ग्रामस्थांना विचारात न घेता वेळोवेळी कब्जा केला आहे. त्यामुळे अंतिम टप्प्यामध्ये मौजे मुद्रे (बुद्रुक), ता. कर्जत, जि. रायगड येथील मुद्रेश्‍वर मंदिरा समोरील गुरचरण सर्व्हे नं. 16/0 क्षेत्र 1233 चौ.मी हि जी जागा उपलब्ध आहे तेथे आम्ही मुद्रे ग्रामस्थांनी मुद्रेश्‍वर देवस्थान समिती तर्फे -कर्जत तालुका सकळ मराठा भवन अशा प्रकारे सामाजिक सभागृहाचा मानस ठेवला आहे.

तरी ग्रामस्थांवर झालेल्या या अन्यायाबाबत आपण विचार करून योग्य तो निर्णय घ्याल अशी अपेक्षा आम्ही मुद्रे ग्रामस्थ बाळगतो. आपल्याकडून कोणत्याही प्रकारची दखल न घेतल्यास जी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती त्या जागेवर निर्माण होईल. त्यास सर्वस्वी शासन व प्रशासन जबाबदार असेल. हे निवेदन उपविभागीय पोलीस अधिकारी, पोलीस निरीक्षक, तहसीलदार, नगरपरिषद आदींना देण्यात आले असून, रायगड जिल्हाधिकार्‍यांना पाठविण्यात आले आहे.

Exit mobile version