शेतीतील फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवा

चाणजे ग्रामस्थांची मागणी

। उरण । वार्ताहर ।

उरण तालुक्यातील द्रोणागिरी धरण तलाव क्रमांक 2 समोरील मौजे चाणजे येथील शेत जमीन समुद्राच्या पाण्यापासून सुरक्षित राहण्यासाठी पाईप आउटलेटवर सिडकोकडून बसविलेले फ्लॅप गेट कायमस्वरूपी ठेवण्यात यावे अशी स्थानिक ग्रामस्थ, शेतकर्‍यांची मागणी आहे. त्यानुसार चाणजे शेतकरी संघर्ष समितीतर्फे रायगड जिल्हाधिकारी, अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक कांदळवन कक्ष मुंबई, कोकण आयुक्त नवी मुंबई, व्यवस्थापकीय संचालक सिडको नवी मुंबई, आमदार-उरण यांना पत्रव्यवहार करून निवेदन देण्यात आले आहे.

द्रोणागिरी धरण तलाव क्रमांक 2 समोरील मौजे चाणजे, तालुका उरण येथील शेत जमीन ही शेतकर्यांच्या स्वतःच्या मालकीचे असून मौजे चाणजे सर्वे नंबर 418, 421, 422, 423 ह्या जमीनी संपादित न करता या जमिनीवर सिडकोकडून पाईप आउटलेट बांधण्यात आले आहे. परंतु पाईप आउटलेटची प्लॅप गेट काढल्यामुळे समुद्राचे पाणी मोठ्या प्रमाणात शेतजमीनीत शिरत आहे. आणि शेतकर्‍यांच्या जमिनीचे अस्तित्व संपुष्टात येत आहे. पिकत्या जमिनी नापीक बनत आहे. शिवाय यासंदर्भात शेतकर्‍यांना शासनाकडून कोणतेही नुकसान भरपाई मिळत नाही. या समस्ये संदर्भात सर्व शेतकर्‍यांनी एकत्र येत चाणजे शेतकरी संघर्ष समितीच्या माध्यमातून संबंधित जमिनीचे होणारे नुकसान, त्याचे फोटो, शेतकर्‍यांचे नाव व सही, सातबारा उतारा आदी सर्व पुरावे शासकीय दप्तरी सादर केले होते. सादर केलेल्या पुराव्याच्या आधारे सिडकोकडून 2021मधील मे महिन्यामध्ये संबंधित पाईप आउटलेटची 80% प्लॅप गेट लावण्यात आली.

परिणामी शेतकर्‍याच्या जमिनीत समुद्राचे पाणी कमी प्रमाणात शिरत आहेत. शेत जमीन सुरक्षितेसाठी व होणार्‍या प्रचंड नुकसानापासून वाचण्यासाठी सिडकोकडून लावण्यात आलेले 80 टक्के प्लॅप गेट 100 टक्के लावण्याचे आदेश देऊन ती कायमस्वरूपी (12 महिने )ठेवण्यात यावी अशी मागणी सर्व शासकीय विभागात पत्रव्यवहाराद्वारे करण्यात आल्याची माहिती चाणजे शेतकरी संघर्ष समितीचे अध्यक्ष अविनाश म्हात्रे यांनी दिली.

2021 च्या जून महिन्यात लावण्यात आलेले 80 टक्के फ्लॅप गेट सप्टेंबर महिन्यानंतर देखील न काढता ते अखंड बाराही महिने ठेवण्यात यावे तसेच 100 टक्के फ्लॅप गेट लावण्यात यावेत जेणेकरून शेतकर्‍यांची सुपीक जमीन सुरक्षित राहील. यासंदर्भात प्रशासनाच्या विविध विभागात पत्रव्यवहार करण्यात आले आहे.
अविनाश म्हात्रे
अध्यक्ष- चाणजे शेतकरी संघर्ष समिती

Exit mobile version