जंजिऱ्यावर कायमस्वरूपी भगवा फडकवा

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचा एल्गार; मुरूडमध्ये भव्य रॅलीद्वारे जनजागृती

| आगरदांडा | प्रतिनिधी |

मुरूड-राजपुरी येथील ऐतिहासिक जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्यासाठी शासनाने अधिकृत परवानगी द्यावी, अशी मागणी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानच्यावतीने करण्यात आली. यासंदर्भात बाल छत्रपती शिवाजी महाराज यांच्या माध्यमातून मुरूडचे तहसीलदार आदेश डफळ यांना निवेदन सादर करण्यात आले.

जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्याच्या मागणीसाठी रविवारी (दि.1) मुरूड शहरातील श्री काळभैरव मंदिरापासून एकदरा येथील खोरा बंदरापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. यावेळी सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संपर्कप्रमुख गौरव शेवाळे, अलिबाग अध्यक्ष शुभम नखाते, रायगड जिल्हा प्रशासक विलास सुर्वे, अपर्णा माळी, पुणे अध्यक्ष आरती गायकवाड, सिंहगड विभागाचे सुशांत मोकाशी, पेण विभाग अध्यक्ष रोहित केनी, पुणे विभागाचे गिरीश झगडे, पिंपरी-चिंचवड विभागाचे गणेश राजपूत, रत्नागिरी विभागाचे विनय कातळकर, पुणे विभाग अध्यक्ष आकाश तुपे यांच्यासह शेकडो पदाधिकारी व दुर्गसेवक उपस्थित होते. त्यानंतर खोरा बंदर येथे आयोजित कार्यक्रमात जंजिरा किल्ल्याचा ऐतिहासिक वारसा, भगव्या ध्वजाचा विषय आणि गड-किल्ल्यांच्या संवर्धनाबाबत मान्यवरांनी आपली मते मांडली. यावेळी डोंबिवलीचे नगरसेवक महेश पाटील यांनी, छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनी जंजिरा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले होते. त्यामुळे या ऐतिहासिक किल्ल्यावर भगवा ध्वज फडकविण्याची मागणी शासनाने सकारात्मकतेने विचारात घ्यावी, असे सांगितले. तसेच, पुरातत्त्व विभागाच्या कार्यपद्धतीवर नाराजी व्यक्त करत गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी आवश्यक कामांना परवानगी मिळावी. तसेच, जंजिरा किल्ल्यावर शासनाच्या अधिकृत परवानगीने भगवा ध्वज फडकवून त्याच्या संरक्षणासाठी चोवीस तास पोलीस बंदोबस्त ठेवावा, अशी मागणीही त्यांनी केली.

सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष डॉ. श्रमिक गोजमगुंडे यांनी, जंजिरा किल्ल्याच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीवर सविस्तर भाष्य केले. 30 मार्च 2016 रोजी किल्ल्यावर भगवा ध्वज लावल्यानंतर निर्माण झालेला वाद, पद्मदुर्ग येथे उभारलेला भगवा ध्वज आणि दुर्गसेवकांनी अनेक वर्षांपासून जपलेली ध्वजाची परंपरा याबाबत त्यांनी माहिती दिली. तसेच, जंजिरा किल्ला हा कोणत्याही एका धर्माचा नसून, देशाचा ऐतिहासिक वारसा आहे. त्याकडे राष्ट्रीय आणि ऐतिहासिक दृष्टिकोनातून पाहिले पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. दरम्यान, जंजिरा किल्ल्यावर कायमस्वरूपी भगवा ध्वज फडकविण्याच्या मागणीचे निवेदन तहसीलदारांना देण्यात आल्याने आता शासन आणि पुरातत्त्व विभाग याबाबत काय भूमिका घेतात, याकडे इतिहासप्रेमी आणि दुर्गसेवकांचे लक्ष लागले आहे.

Exit mobile version