| पनवेल | प्रतिनिधी |
कडक उन्हाचा त्रास जसा मानवाला होतो, तसा पशू-पक्ष्यांनाही होतो. उन्हामुळे पक्ष्यांनाही उष्माघात होतो. त्यांनाही तहान लागते. त्यासाठी प्रत्येक घराच्या अंगणात, परसात, बागेत, गॅलरीमध्ये पक्ष्यांसाठी पाणी ठेवा, असे आवाहन पनवेल परिसरातील विविध सेविभावी संस्था व प्राणीमित्रांनी समाजमाध्यमांवर केले आहे.
अन्नसाखळीतील महत्त्वाचे घटक असणारे पक्षी पर्यावरणरक्षक आहेत. संपूर्ण मानवजातीसाठी पक्ष्यांची भूमिका व अस्तित्व महत्त्वाचे आहे. पर्यावरणाचे स्वच्छतादूत असणारे हे जीव आपल्याला खूप काही शिकवतात. त्या बदल्यात आपण मात्र त्यांचे अन्न, पाणी, निवारा सगळेच हिरावून घेतले. शहरातील झाडांची संख्या कमी झाली. त्यामुळे पक्ष्यांचा नैसर्गिक अधिवास हिरावला गेला. यंदा तर मार्चपूर्वीच कडक उन्हाळ्याला सुरुवात झाल्याने पक्ष्यांनाही उन्हाचा त्रास होत आहे. त्यांचे जीवन सुसह्य व्हावे, यासाठी प्रत्येकाने पक्ष्यांसाठी पाणी ठेवायलाच हवे, असे संदेश समाजमाध्यमांवरील पोस्टमधून प्रसारित होत आहेत. बहुतांश वेळा प्लास्टिक किंवा स्टीलच्या भांड्यात पाणी ठेवले जाते. उन्हात हे पाणी गरम होते, त्यामुळे पक्ष्यांसाठी मातीच्या भांड्यातच पाणी ठेवायला हवे. फुलातील मध, झाडावरचे किडे, हवेत उडणारे किडे, अळ्या हे बहुतांश पक्ष्यांचे खाद्य आहे. काही पक्षी धान्य, फळे खातात.
पाण्याचे भांडे गोंगाटापासून दूर ठेवा पाण्याचे भांडे ठेवताना ते गोंगाटापासून दूर हवे, जेणेकरून पक्षी पाणी प्यायला येतील. जास्त गोंगाटात पक्षी येत नाहीत. नवीन ठिकाणी पाणी पिण्याची सवय लागण्यासाठी पक्ष्यांना सात-आठ दिवस लागतात. लगेच पक्षी पाणी पिणार नाहीत. त्यामुळे संयम ठेवा, मातीची भांडी उथळ असावी, असेही त्यांनी सांगितले.
सध्याच्या वातावरणात पक्ष्यांसाठी फक्त पाणी ठेवणे पुरेसे आहे. पक्ष्यांच्या खाद्याची माहिती घेऊनच अन्न ठेवा. अशा उन्हात पक्षी भोवळ येऊन खाली पडतात. अशावेळी पक्ष्यांना गार पाणी द्या किंवा ग्लुकोजचे पाणी द्या किंवा पक्षीतज्ज्ञांची मदत घ्या. पक्ष्यांसाठी आपण इतके नक्कीच करू शकतो.
धनंजय पाटील,
प्राणीमित्र, पनवेल