सरकारच्या दडपशाहीमुळे रोजगाराचा मुद्दा पेटला; खालापूर पोलिसांच्या कारवाईने संताप
| खालापूर | प्रतिनिधी |
स्थानिक भूमिपुत्रांना रोजगारात प्राधान्य मिळावे, या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला खालापूर तालुक्यात आता निर्णायक वळण मिळाले आहे. आंदोलनाचे नेतृत्व करणारे सुधाकर घारे यांना खालापूर पोलिसांनी अटक केल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या कारवाईनंतर परिसरातील राजकीय आणि सामाजिक वातावरण चांगलेच तापले आहे.
टाटा स्टील आणि गोदरेजसारख्या मोठ्या औद्योगिक कंपन्यांच्या परिसरात स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी मिळाव्यात, स्थानिकांना प्राधान्य मिळावे, ही मागणी घेऊन महाएल्गार उभारण्यात आला आहे. आमची माती, आमचा अधिकार या घोषणेसह सुरू झालेल्या या लढ्याला सर्वपक्षीय कार्यकर्त्यांचा प्रतिसाद मिळत असून शेतकरी कामगार पक्षानेही पाठिंबा दिला आहे.
भूमिपुत्रांना डावलून बाहेरील कामगारांना प्राधान्य देऊ नये, अशी मागणी आंदोलनकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. याच मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनावर पोलिसांनी कारवाई केल्याने भूमिपुत्रांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप समर्थकांकडून करण्यात आला आहे. स्थानिक तरुणांच्या रोजगाराचा प्रश्न चर्चेतून सोडविण्याऐवजी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्याला अटक करण्याची वेळ प्रशासनावर का आली? असा संतप्त सवाल आता उपस्थित होत आहे. घारेंच्या अटकेमुळे आंदोलन थांबण्याऐवजी कार्यकर्त्यांमध्ये संताप आणखी वाढल्याचे चित्र आहे. रोजगाराचा हक्क मागणे हा गुन्हा आहे का? असा सवाल उपस्थित करत कार्यकर्त्यांनी आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा दिला आहे.
घारेंच्या अटकेची माहिती समोर आल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये संतापाची प्रतिक्रिया उमटली. कारवाई झाली म्हणून आंदोलन मागे घेणार नाही. भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न आणखी ताकदीने मांडला जाईल, असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला आहे. दरम्यान, अटकेच्या निषेधार्थ सर्वपक्षीय पदाधिकारी, कार्यकर्ते आणि आंदोलनाच्या समर्थकांनी खालापूर पोलीस ठाण्याबाहेर मोठ्या संख्येने जमा व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे. त्यामुळे पोलीस ठाण्याच्या परिसरात कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी प्रशासनाकडून खबरदारी घेतली जाण्याची शक्यता आहे.
अटक झाली तरी लढा थांबणार नाही!
भूमिपुत्रांच्या रोजगाराचा प्रश्न आता केवळ एका आंदोलनापुरता मर्यादित राहिलेला नसून, स्थानिक विरुद्ध बाहेरील रोजगाराचा मुद्दा पुन्हा चर्चेत आला आहे. उद्योगांना स्थानिकांच्या अपेक्षांची जाणीव करून देणे आणि रोजगाराच्या संधींमध्ये स्थानिकांना प्राधान्य मिळवून देणे, हा आंदोलनाचा प्रमुख मुद्दा असल्याचे समर्थकांचे म्हणणे आहे. पोलिसांनी घारेंना नेमक्या कोणत्या कारणास्तव अटक केली, त्यांच्यावर कोणती कलमे लावण्यात आली आणि पुढील कायदेशीर कारवाई काय होणार, याबाबत अधिकृत माहिती समोर येणे बाकी आहे. मात्र, घारेंच्या अटकेनंतर आंदोलनाची पुढील दिशा काय असणार, याकडे संपूर्ण खालापूर तालुक्याचे लक्ष लागले आहे.
नमिता घारे करणार नेतृत्व
महाएल्गारमध्ये मोठ्या संख्येने कार्यकर्ते आणि स्थानिक तरुण सहभागी होण्याची तयारी सुरू आहे. घारेंच्या अटकेनंतर आता 3 सप्टेंबरचा आंदोलनाचा दिवस प्रशासनासाठी मोठी कसोटी ठरणार असून या आंदोलनाचे नेतृत्व सुधाकर घारे यांच्या पत्नी नमिता घारे करणार असल्याचे स्थानिकांकडून सांगण्यात आले. उद्योगांसाठी जमीन स्थानिकांची, संसाधने स्थानिकांची; मग रोजगाराच्या वेळी भूमिपुत्रांना डावलले का जाते? हा सवाल आता केवळ कर्जत-खालापूरचा राहिलेला नसून संपूर्ण रायगडच्या औद्योगिक विकासाच्या मॉडेलवर बोट ठेवणारा ठरत आहे.
हा लढा कोण्या एका पक्षाचा नाही; हा कर्जत-खालापूरच्या भूमिपुत्रांच्या भवितव्याचा लढा आहे. अटक, दबाव आणि पोलिसी कारवाईने हा आवाज दाबता येणार नाही. स्थानिकांच्या जमिनी गेल्या, शेती गेली, परिसराचे औद्योगिकीकरण झाले; आता जर स्थानिकांच्या मुलांना रोजगारासाठीही संघर्ष करावा लागत असेल, तर सरकारने याचे उत्तर द्यायलाच हवे! भूमिपुत्रांच्या संयमाची परीक्षा घेऊ नका. रोजगाराचा प्रश्न चर्चेने सुटू शकतो; पण दडपशाहीने पेटलेला असंतोष अधिक मोठा होतो. सरकारने पुढे येऊन स्थानिकांच्या रोजगाराबाबत ठोस निर्णय घ्यावा. अन्यथा भूमिपुत्रांच्या हक्कासाठीचा हा आवाज अधिक बुलंद होईल. कर्जत-खालापूरच्या तरुणांना रोजगार मिळावा, यासाठी उभारलेल्या महाएल्गारला शेतकरी कामगार पक्षाचा ठाम पाठिंबा आहे.
चित्रलेखा पाटील,
प्रवक्त्या, शेकाप
पाठिंबा देणाऱ्यांना नोटिसा
खालापूर येथे होणाऱ्या महाएल्गार मोर्चा साठी पाठिंबा अनेक संस्थांनी दिला आहे.दुसरीकडे याच पाठिंबा देणाऱ्या संस्था आणि राजकीय पक्ष यांना खालापूर पोलीस यांच्याकडून नोटिसा बजावण्यात येत आहेत. खालापूर पोलीस कर्जत तालुक्यात त्या-त्या संस्था, राजकीय पक्ष यांना गाठून नोटीस बजावली जात आहे. त्यामुळे देखील कर्जत तालुक्यात खळबळ माजली आहे.
चर्चेसाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना अटक
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते (अजित पवार) सुधाकर घारे, जिल्हा परिषद सदस्य संतोष बैलमारे, माजी जिल्हा परिषद सदस्य सुरेश पाटील, काँग्रेसचे सागर जाधव, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अंकित साखरे, शेतकरी कामगार पक्षाचे कैलास गायकवाड, रवी रोकडे यांच्यासह अनेक नेते पोलीस ठाण्यात उपस्थित होते. मात्र, चर्चेसाठी आलेल्या या नेत्यांनाच पोलिसांनी ताब्यात घेतल्याने रोजगाराच्या प्रश्नाचे उत्तर चर्चेने द्यायचे की कारवाईने? असा सवाल उपस्थित झाला आहे. ताब्यात घेतल्यानंतर सर्व नेत्यांना पोलीस वाहनातून अलिबागला नेण्यात आल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले.






