जिल्ह्याच्या शिरपेचात रोवला तुरा
| रसायनी | प्रतिनिधी |
ग्रामीण विकास, सुशासन आणि लोकसहभागाच्या माध्यमातून गावांच्या सर्वांगीण विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान’मध्ये रायगड जिल्ह्याने उल्लेखनीय यश संपादन केले आहे. या अभियानात खालापूर पंचायत समितीने राज्यस्तरावर द्वितीय क्रमांक पटकावून रायगड जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. नाशिक येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या सोहळ्यात रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, उपमुख्य कार्यकारी अधिकारी विशाल तनपुरे आणि खालापूर पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संदीप कराड यांनी पुरस्कार स्वीकारला. यावेळी अभियानात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चौक व वडवळ ग्रामपंचायतींचे सरपंच तसेच ग्रामपंचायत अधिकारी उपस्थित होते.
या अभियानात रायगड जिल्ह्यातील तब्बल 163 ग्रामपंचायतींनी सहभाग नोंदवला होता. त्यामध्ये खालापूर तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतींचा समावेश होता. अभियानातील निर्धारित निकषांनुसार कामांचे नियोजन, विविध विकासकामांची प्रभावी अंमलबजावणी, प्रशासनातील समन्वय आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग या बाबींमुळे खालापूर पंचायत समितीला राज्यात द्वितीय क्रमांकाचा बहुमान मिळाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, पहिल्या टप्प्यातील यशानंतर ‘मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान-2’ या पुढील टप्प्याला सुरुवात झाली आहे. या अभियानात जलसंधारण, स्वच्छता, ग्रामविकास आणि लोकसहभागाला विशेष प्राधान्य दिले जाणार आहे. ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद या तिन्ही स्तरांवर उत्कृष्ट कामगिरी करून पुरस्कार मिळविण्यासाठी प्रयत्न केले जातील, असा निर्धार रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांनी व्यक्त केला.
