| पनवेल | प्रतिनिधी |
नवीन पनवेलमधील खांदा कॉलनी परिसरात बेकायदेशीर फेरीवाले व टपऱ्यांमुळे नागरिकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असल्याची तक्रार स्थानिक व्यापाऱ्यांकडून होत आहे. येथील फूटपाथवर मोठ्या प्रमाणात फेरीवाल्यांनी कब्जा केल्याने पादचाऱ्यांना चालणे कठीण झाले असून वाहतूक व्यवस्थेलाही अडथळा निर्माण होत आहे.
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, रोजबाजारासाठी राखीव असलेल्या मोकळ्या भूखंडावर काही राजकीय पाठबळ असलेल्या भूमाफियांनी बेकायदेशीर टपऱ्या उभारून त्या भाड्याने दिल्या आहेत. या टपऱ्यांकडून महापालिका किंवा सिडकोकडे कोणताही कर भरला जात नसल्याचा आरोप करण्यात येत आहे. तरीही या टपऱ्यांना पाणी व वीज कनेक्शन उपलब्ध असल्याने प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. याशिवाय रेल्वे परिसरातील झोपडपट्ट्यांमध्येही मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर दुकाने उभारली जात असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. कायदेशीर व्यवसाय करणारे व्यापारी मात्र सर्व कर भरूनही मूलभूत सुविधा मिळत नसल्याची नाराजी व्यक्त करत आहेत. सिडकोकडून सुमारे चार वर्षांपूर्वी नवीन पनवेल, खांदा कॉलनी परिसरातील 17 रोजबाजार भूखंड महापालिकेकडे हस्तांतरित करण्यात आले होते. मात्र, त्यानंतरही या परिसरातील फेरीवाले व बेकायदेशीर टपऱ्यांचा प्रश्न कायम असून महापालिका प्रशासनाला तो सोडविण्यात अपयश येत असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, स्थानिक लोकप्रतिनिधी वारंवार या समस्येसाठी सिडको अधिकाऱ्यांनाच जबाबदार धरत असल्याचेही नागरिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या प्रश्नावर नेमकी जबाबदारी कोणाची, याबाबत संभ्रम निर्माण झाला असून प्रशासनाने तातडीने ठोस कारवाई करून फूटपाथ मोकळे करावेत व रोजबाजार भूखंडावरील बेकायदेशीर टपऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
खांदा कॉलनीला फेरीवाल्यांचा विळखा
